ओझे | प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड या गावातुन ओझरखेड कॅनॉल जात असुन मागील पंधरा दिवसांपासुन हा कॅनॉल दुथडी भरुन वाहत आहे. परंतु या कॅनॉल शेजारील शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.
दुष्कळात उभा केलेला टोमॅटो, दर नसल्यामुळे शेतकरी वर्ग आधीच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यात अजुन भर पडल्याचे दिसुन आले. शिंदवड येथे ओझरखेड कॅनॉलचे पाणी पाझरत असल्यामुळे टोमॅटो मधुन पाणी वाहत आहे. त्यामुळे अति पाण्यामुळे टोमॅटो सुकत आहे.
सध्या द्राक्ष हंगाम सुरु झाला असुन घड कमकुवत निघतांना दिसत आहे, आणि हे घड वाचवण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहे. पण सततचा ओलावा असल्याने घड जिरण्याचे प्रमाण वाढत आहे. कॅनॉलच्या पाण्यामुळे ट्रँक्टर चिखलात अडकत आहे. कॅनॉलचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की कालवा फुटतो की काय अशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भगीरथ बस्ते यांच्या मळ्याजवळ कालव्यातुन पाणी बाहेर पडायला फक्त ७ इंच इतकाच फरक दिसत असून अशा अनेक अडचणी सध्या शेतकऱ्यांसमोर असुन लवकरात लवकर पाणी बंद करण्याची मागणी शिंदवड व परिसरातील शेतकरी करत आहे.
या विषयीचे निवेदन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दिंडोरी दौऱ्यावर आले असताना परिसरातील शेतकऱ्यांकडून निवदेन देण्यात आले असुन या संबंधीचे निवदेन जलसंपदा विभागाला देखील देण्यात येणार आहे.