सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar
तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात जुन्या पंचाळे रस्त्यावर (panchale road) व मिठसागरे शिवारात अर्धा तास झालेल्या ढगफुुटीसदृश पावसाने (heavy rain) एका शेतकर्याच्या (farmers) विहिरीचा (well) कथडा तुटल्याची घटना घडली. शेतातील पाणी विहिरीत शिरल्याने काही मिनिटातच विहीर तुडुंब भरल्याचे बघायला मिळाले.
सोमवारी (दि.27) दुपारच्या सुमारास पांगरी शिवारातील अभंग मळा, पांगरी-पंचाळे शिवारातील जाधव मळा, पांगरी-मिठसागरे शिव या भागात जोरदार पाऊस सुरु झाला. अवघ्या अर्ध्या तासात प्रत्येक शेतात पाणीच पाणी झाले होते. मुसळधार पावसामुळे (heavy rain) रस्त्यानेही काही दिसेनासे झाले होते. पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढे-नाले दुथडी भरुन वाहत असल्याचे चित्र होते. या पावसाने भारत बाबासाहेब पांगारकर यांच्या शेताजवळ असलेला बंधाराही काही वेळातच ओव्हरफ्लो (Overflow) झाला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सिन्नरच्या (sinnar) पूर्व भागात समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी (farmer) सुखावला आहे. पेरण्यायोग्य पाऊस झाल्याने लवकरच शेतकरी पेरण्या करतील असे चित्र आहे. अनेकांच्या शेतात अजूनही पाणी असल्याने पेरणी खोळंबली आहे.
पंचाळेत बंधारा फुटला
तालुक्यातील पंचाळे (panchale) शिवारात सोमवारी (दि.27) दुपारच्या सुमारास झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने मातीचा साठवण बंधारा फुटल्याची (dam burst) घटना घडली. बंधार्याचे पाणी शेतकर्यांच्या शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर मातीही वाहून गेली.
तालुक्याचा पूर्व भाग हा नेहमीच पावसापासून वंचित राहत आल्याने तालुक्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा या परिसरात मान्सूनची (monsoon) जोरदार सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सोमवारी (दि.27) दुपारी 4 च्या दरम्यान पंचाळे परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
सर्वदूर पाऊस झाल्याने जवळपास सर्वच शेतकर्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे बघायला मिळाले. पंचाळे परिसरात शांताराम थोरात यांच्या शेताजवळ असलेल्या साठवण बंधार्यात गेल्या काही वर्षात कधीच पाणी साठले नव्हते. मात्र, या ढगफुटीसदृश पावसाने बंधारा तुडुंब भरल्याचे बघायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांत बंधार्यांची डागडुजी व दुरुस्ती न केल्याने बंधारा फुटुन त्यातील पाणी परिसरातील शेतात गेल्याने मोठे नुकसान झाले.
भोकणी रस्त्यालगतच्या या साठवण बंधार्यात अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने बंधार्याचा कथडा वाहून गेला. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतातील कसदार माती वाहून गेली आहे. अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसत होते. शेतातील पाणी पातळी कमी होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने खरीप हंगाम आठ ते दहा दिवस उशीरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.