Saturday, January 24, 2026
Homeक्राईमJamkhed : नृत्यांगनेला छळणारा माजी नगरसेवक कोणाचा?

Jamkhed : नृत्यांगनेला छळणारा माजी नगरसेवक कोणाचा?

जामखेड येथील भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेेकांवर आरोप-प्रत्यारोप

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

येथील कलाकेंद्रातील नृत्यांगणा दिपाली गोकुळ पाटील (वय 35) हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.4) उघडकीस आली. या प्रकरणात माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आ. रोहित पवार यांनी ट्विट करून आरोपी हा भाजपाशी असल्याचे सांगत जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -

संबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले असून गायकवाड नेमका कोणत्या पक्षाचा? यावरुन भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

YouTube video player

9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला शनिवारी (दि.6) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करीत आहेत.

रोहित पवारांचाच कार्यकर्ता : सभापती कार्ले

नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड सन 2016 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवारांसोबत होते. त्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, गायकवाड यांच्या पत्नीने नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली तरी संदीप गायकवाड यांचा भाजपात कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही. ते आजही राष्ट्रवादीतच आहेत. नगरपरिषद निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट होताच रोहित पवारांनी भाजपला व आमच्या नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे. नृत्यांगना दिपाली पाटील यांच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या आडून रोहित पवार हे घाणेरडे राजकारण करून जामखेडची बदनामी करू पाहत आहेत, ही बाब जनता कदापी सहन करणार नाही, असेही सभापती कार्ले म्हणाले.
नुकत्याच झालेल्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत रोहित पवारांनी संदीप गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने गायकवाड यांच्या पत्नीने बंडखोरी करत ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी घेतली.

मात्र संदीप गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही. एकाच कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या पक्षात सक्रीय असतात. एखाद्याने काही चुकीचे केले तर त्याचा संबंध कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाशी जोडणे म्हणजे बालबुध्दी उपद्रव होय, हा उद्योग सध्या रोहित पवारांकडून सुरू आहे, अशी टीका करत आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे, ही आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

भाजपचा असल्याचे हजार पुरावे : गोलेकर

नृत्यांगना दिपाली पाटील हिच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी अटक केलेला आरोपी माजी नगरसेवक संदिप गायकवाड हा भाजपचाच असून याचे एक नाही तर हजार पुरावे उपलब्ध आहेत. परंतु अंगलट आले की दुसर्‍यावर ढकलायचं आणि स्वतः मात्र ‘मी नाही त्यातली अन् कडी आतली’ अशी भूमिका घ्यायची ही भाजपाची वृत्ती असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संदिप गायकवाड हा भाजपचाच असल्याचे अनेक फोटोही समोर आणले. गायकवाडची पत्नी भाजपाची उमेदवार असून तिचा जाहीर प्रचार तो करत होता.

तसेच एका रॅलीमध्ये गुंड निलेश घायवळ विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाया पडत असल्याचा व्हिडिओही त्यांनी व्हायरल केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गायकवाड याने भाजपाचा जाहीर प्रचार करुनही भाजपा हा आता त्याला आपला नसल्याचे म्हणत असेल तर भाजप हा कार्यकर्त्यांसाठी वापरा आणि फेकून द्या अशा वृत्तीचा पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच गायकवाड याच्या कुकृत्यामुळे समाजात भाजपाचे नाक कापल्यामुळे तो मी नव्हेच अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.

आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी आवाज उठवला नसता तर हा गुन्हा दाबण्याचे प्रयत्न सुरु होते. आरोपी संदिप गायकवाड हा राष्ट्रवादीचा आहे, असे भाजपाचे म्हणणे असेल तर दिपाली पाटील हिने गुरुवारी आत्महत्या केली, परंतु गुन्हा दाखल होण्यासाठी 24 तासापेक्षाही अधिक काळ का लागला? हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न कुणी केला? सीसीटीव्ही फुटेज, लॉजमधील रजिस्टर गायब करण्याचा प्रयत्न कुणी केला? गुन्हा दाबण्यासाठी पोलिसांना फोन करुन कुणी दबाव आणला? या सगळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...