Sunday, November 24, 2024
Homeधुळेजैन मंदिरात धाडसी चोरी, 7 लाखांचा ऐवज लंपास

जैन मंदिरात धाडसी चोरी, 7 लाखांचा ऐवज लंपास

धुळे । dhule प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात चोरी, घरफोडी सत्र सुरूच असून काल चोरट्यांनी कहरच केला. शहरातील नटराज चित्रमंदिरामागे असलेल्या राजेंद्र सुरी नगरातील जैन मंदिरात (Jain temple) धाडसी चोरी (Daring theft) केली. वॉचमन झोपलेला असतांना त्याच्या रुमला बाहेरुन कडी लावून चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून मूर्तीवरील चांदीचे दोन मुकूट, सोन्याच्या दोन कपाळपट्टया व दानपेटीतील रोख रक्कम असा सुमारे 7 लाखांचा ऐवज चोरट्यांनी (Instead of thieves) लंपास (lumpas) केला. आज सकाळी पुजारी मंदिरात आले असता ही घटना लक्षात आली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्यासह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, उपनिरीक्षक ठाकरे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने 200 फुटापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनीही मंदिरास भेट देत पहाणी केली. तसेच मंदिराचे अध्यक्ष विजय राठोड यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

राजेंद्र सुरी नगरात श्री पार्श्व भैरव धाम हे दुमजली मंदिर आहे. या मंदिरात किशोर भाऊराव वराडे (रा.अलंकार सोसायटी) हे वॉचमन म्हणून कामाला आहेत. मध्यरात्री नेहमीप्रमाणे ते आपल्या रुममध्ये झोपले होते. पहाटे साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास एका चोरट्याने त्यांच्या रुमला बाहेरुन कडी लावली. त्यानंतर चोरट्याने पार्श्व भैरवधाम मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तळ मजल्यावरील भगवान नाकोडा यांच्या मुर्तीवरील चांदीचा दोन ते अडीच किलो वजनाचा मुकूट, 25 ग्रॅम वजनाची सोन्याची कपाळपट्टी व दानपेटीतील सुमारे 20 ते 25 हजार रुपये लंपास केले. तसेच वरील मजल्यावर असलेल्या संकेश्वर पार्श्वनाथ भगवान यांच्या मुर्तीवरील चांदीचा दोन ते अडीच किलो वजनाचा मुकूट, 25 ग्रॅम वजनाची सोन्याची कपाळपट्टी व दानपेटीतील सुमारे 20 हजार रुपये असा ऐवज चोरला. त्यानंतर शेजारीच असलेले राजेंद्र सुरी गुरु मंदिराच्या दरवाज्याचेही कुलूपही चोरट्याने तोडले. या मंदिराच्या दानपेटीतून 20 ते 25 हजार रुपये तसेच चांदीचे 250 ते 300 ग्रॅम वजनाचे नारळ असा एकूण सुमारे सात लाखांचा ऐवज चोरुन नेला.

मंदिराचे पुजारी जितू जोशी हे सकाळी 6 वाजता पुजेसाठी आले असता त्यांना दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी वॉचमनच्या रुमची कडी उघडून त्याला बाहेर काढले. तसेच घटनेची माहिती मंदिराचे अध्यक्ष विजय राठोड यांना दिली. विजय राठोड यांनी मंदिरातील ऐवजची तपासणी केली असता त्यांना वरील मुद्देमाल चोरीस गेल्यास लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. त्यांनी पाहणी करीत सीसीटीव्हीची तपासणी केली असता चोरटा त्यात दिसून आला. पहाटे 3.30 ते 4.30 या वेळेत त्याने ही चोरी केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे 3.22 वाजता पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे वाहनही मंदिराजवळून गेले. यावेळी पोलिसांनी सायरनही वाजविला. परंतु, या आवाजानेही वॉचमनला जाग आली नाही. हा वॉचमन गेल्या चार वर्षापासून येथे काम करत आहे.

महावीर नगरातही घरफोडी

राजेंद्र सुरी नगरानजीक असलेल्या महाविर नगरातही चोरट्याने व्यापार्‍याकडे घरफोडी केली. अरिहंत भवन मागे प्लॉट नं.12 मध्ये निलेश रामलाल जैन हे राहतात. त्यांचे मुकटी येथे किराणा दुकान आहे. मुलांच्या शाळेसाठी ते मुकटीला ये जा करायचे. सध्या शाळेला सुटी असल्याने ते कुटूंबासह मुकटी येथे गेले होेते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मुलांच्या गल्लयातील 20 ते 25 हजाराची रोकड असा ऐवज चोरुन नेला. आज सकाळी निलेश जैन यांच्या घरासमोर राहणार्‍या पंकज धामणे यांना जैन यांचे घर उघडे दिसले. त्यानंतर ही चोरीची घटना उघड झाली.

चिल्लर सोडली जागीच

मंदिरातून चोरट्यांनी किंमती ऐजव लंपास केला. मात्र दानपेटीतील चिल्लर तेथेच सोडून दिली. दानपेटीत मोठ्या प्रमाणात चिल्लर होती. परंतु, चिल्लरला चोरट्याने हातही लावला नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या