Saturday, September 14, 2024
Homeजळगावकोरोनामुळे ज्येष्ठांसमोर अंधार

कोरोनामुळे ज्येष्ठांसमोर अंधार

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

- Advertisement -

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदू शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे वृद्धांवर अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.

जिल्हा रुग्णालयच्या नेत्र शल्यचिकित्सा विभागात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया दर महिन्यात होत असतात. त्याचबरोबर काचबिंदूच्या देखील शस्त्रक्रिया करण्यात येतात. राष्ट्रीय योजनेंतर्गत या सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य मोफत करण्यात येतात.

त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील सर्वसामान्य नागरिकाना मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ होतो. परंतु सद्यस्थितीत कोरोना साथरोग प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील अधिग्रहित करण्यात आले आहे, त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू नेत्र चिकित्सा विभाग बंद आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियां साठी 5 हजार ते दीड सव्वा लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागते. जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सा विभागात महिन्याला सुमारे 150 ते 200 च्या वर नेत्र शल्य चिकीत्सा शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत.

याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागांतील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना आहे. मोतीबिंदू 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मोतिबिंदू असलेल्या रुग्णाला अंधुक दिसते. मोतीबिंदू अधिक दिवस तसाच राहिला, तर त्याचे रूपांतर काचबिंदूत होते. त्यामुळे सध्यस्थितीत जिल्ह्यातील ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर अंधाराचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे मार्चपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच ही शस्त्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या