राहाता | Rahata
नाशिक जिल्ह्यात सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून संततधार सुरु असून दारणा धरण निम्मे भरल्याने या धरणातून विसर्ग सुरु झाला आहे. तर आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता गंगापूर धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदी जायकवाडीच्या दिशेने दुथडी वाहु लागली आहे. गोदावरीत काल सायंकाळी 6 वाजता 12620 क्युसेकने विसर्ग सुरु होता. रात्री 8 वाजता हा विसर्ग 24998 क्युसेक करण्यात आला. प्रथमच जून मध्येच गोदावरी दुथडी भरुन वाहु लागल्याने हे दिलासादायक चित्र आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बुंधवारी रात्री संततधार पाऊस झाला. यापावसाने नाशिकच्या धरणांमध्ये नवीन पाण्याची मोठी आवक झाली. दारणात काल सकाळी 6 पर्यंत अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. इगतपुरीच्या दरम्यान 6 इंच पाऊस झाला. दारणाच्या पाणलोटातील घोटी येथे काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 115 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 45 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जून पासून दारणात 845 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. हे पाणी पाऊण टीएमसीहुन अधिक आहे. काल सकाळी 6 वाजता दारणात 3343 दलघफू पाणीसाठा झाला होता. तो 46.76 टक्के इतका झाला होता. काल दुपारी 12 वाजेपर्यंत 50 टक्के इतका झाला. द्वार परिचालन सुचिनुसार जूनच्या दुसर्या पंधरवड्यात जितके टक्के पाणीसाठा साठविणे अपेक्षित आहे.
त्या पेक्षा जादा आलेले पाणी नदीत पात्रात सोडावे लागते. त्यामुळे दारणा 48.15 टक्क्यांच्या पुढे गेल्याने त्यातून काल दुपारी 3 वाजता जलविद्युत प्रकल्पाच्या गेटमधून 1100 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. धरणातील आवक पाहता धरणाच्या वक्राकार दरवाजामधूनही विसर्ग करण्यास सुरुवात केली. काल रात्री 7.30 वाजता दारणातून 3062 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. रात्री 10 वाजता हा विसर्ग 4742 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. दरम्यान, दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर असल्याने त्या तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे दारणात मोठी आवक होऊ शकते. खर्या अर्थाने दारणाच्या पाणलोटात मान्सून सक्रीय झाला आहे. बुधवार रात्री व गुरुवार दुपारी 3 वाजे पर्यंत पावसाने सह्याद्रीचा घाटमाथा झोडपून काढला. यंदा दारणात जूनमध्ये 35 टक्के पाणीसाठा होता.
त्यामुळे 15 टक्के साठा पावसाने होऊन आता विसर्ग सुरु झाला आहे. हा विसर्ग टप्प्याटप्याने वाढविला जाणार आहे.
दारणाच्या वर असलेल्या भावली धरणाच्या परिसरात काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 159 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे भावलीतही पाण्याची आवक होऊ लागली आहे. 1 जून पासुन भावलीला काल पर्यंत 498 मिमी एकूण पाऊस नोंदला गेला आहे. वाकी येथे 103 मिमी, भाम च्या भिंतीजवळ 90 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोटातही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गंगापूर धरणही निम्मे भरले आहे. त्यामुळे या धरणातूनही आज शुक्रवारी सकाळी 6 वाजता विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सुरुवातीला 500 क्युसेक ने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर तो वाढवित सकाळी 9 वाजता 1000 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. नवीन पाण्याच्या आवके नुसार गंगापूरातील विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर च्या भिंतीजवळ काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत 80 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या पाणलोटातील त्र्यंबकला 142 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 97 मिमी, गौतमी गोदावरीला 105 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपीला 92 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, नांदूर मधमेश्वरच्या पाणलोटातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या बंधार्यात छोट्या मोठ्या नद्या तसेच ओढे ओसंडून वाहुन येत आहेत. त्यामुळे नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हा बंधारा अगोदर तुडूंब भरला असल्याने नवीन येणारे पाणी गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने वेगाने वाहत आहे.
काल सकाळी 10 वाजता या बंधार्यातून गोदावरीत सुरुवातीला 807 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. त्यानंतर तो वाढवत दुपारी 12 वाजता 1614 क्युसेक इतका करण्यात आला. दुपारी 3 वाजता तो आणखी वाढवत 3228 असा दुप्पट करण्यात आला. नंतर तो 4842 क्युसेक करण्यात आला. काल सायंकाळी वाजता गोदावरी नदीत या बंधार्यातून 12620 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. दारणा तसेच गंगापूर व अन्य छोट्या नद्या, ओढे यांचे पाणी या बंधार्यात दाखल होवून गोदावरीचा विसर्ग रात्रीतून वाढू शकतो. त्यामुळे गोदाकाठाला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी दुथडी भरुन वाहु लागली आहे.
जायकवाडी 29.66 टक्के
दरम्यान खाली जायकवाडी जलाशयात काल गुरुवार च्या आकडेवारी नुसार जायकवाडीत उपयुक्तसाठा 29.66 टक्के इतका आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला जायकवाडीत उपयुक्तसाठा 5.15 टक्के इतका होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र जायकवाडीची परिस्थिती चांगली आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात जायकवाडी जलाशयात 819 क्युसेक पाणी नव्याने दाखल झाले.




