Friday, September 4, 2026
HomeनगरRahata : दारणात 2.1 टीएमसी आवक, भावली 66, गंगापूर 42 टक्क्यांवर, गोदावरीत...

Rahata : दारणात 2.1 टीएमसी आवक, भावली 66, गंगापूर 42 टक्क्यांवर, गोदावरीत 15775 क्युसेकने विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत सह्याद्रीचा घाटमाथा पावसाने झोडपून काढला! या पावसाने दारणा धरणात 2 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. 7 टक्क्यांवरून हे धरण दीड दिवसात 30 टक्क्यांवर पोहचले आहे. भावली 66.11 टक्क्यांवर, गंगापूरच्या पाणलोटातही मुसळधार पाऊस झाला. 12 तासात त्र्यंबकला 118 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर 42 टक्क्यांवर पोहचले आहे. दरम्यान नाशिक शहर व चांदोरी, सायखेडा परिसरातील दमदार पावसाने नांदुरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने काल या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 15775 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात मुसळधार, ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला होता. सोमवारी ते मंगळवारी दुपारपर्यंत पावसाने सह्याद्रीचा घाटमाथा झोडपून काढला. यामुळे धरणांमधील पाणीसाठा फुगत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भावलीला 239 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 120 मिमी पावसाची नोंद झाली. वाकी 109, भाम 184 मिमी असा पाऊस नोंदला गेला. दारणा धरणात काल सकाळी 6 पर्यंत 1 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. काल सकाळी हे धरण 21.60 टक्के भरले. त्यानंतर दुपारपर्यंत मुसळधार झाल्याने काल सायंकाळी दारणा 29.79 टक्क्यांवर पोहचले आहे. दीड दिवसातील पावसाने दारणात 2.1 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. भाम 30.32 टक्क्यांवर, भावली 66.11 टक्क्यांवर पोहचले आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाची मुसळधार होती. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरला 117 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपीला 90 मिमी, गौतमी गोदावरीला 118 मिमी, त्र्यंबक 125 मिमी, अंबोली 148 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 12 तासात गंगापूरला 43 मिमी, त्र्यंबक 118 मिमी, अंबोली 106 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर काल सायंकाळी 6 वाजता 42.04 टक्क्यांवर पोहचले आहे. कश्यपीला 68 मिमी, गौतमी 84 मिमी पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.
नाशिक शहरासह सायखेडा, चांदोरी परिसरातही मुसळधार होती. नाशिकला 80 मिमी पावसाची नोंद झाली.

नांदुरमध्मेश्वर बंधार्‍याच्या पश्चिम भागातील पावसाचे पाणी दाखल झाल्याने सोमवार पासून गोदावरी वाहू लागली आहे. सुरुवातीला 2614 क्यूसेक ने सुरू असलेला विसर्ग काल टप्प्याटप्प्याने वाढवत 15775 क्युसेकवर नेण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरीच्या उजव्या कालव्यालाही 200 क्युसेक ने पाणी काल सायंकाळी 6 वाजता सोडण्यात आले आहे. गौतमी गोदावरी धरणातूनही गंगापूरच्या दिशेने 980 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.

कालव्यांच्या लाभक्षेत्रात रिपरिप!
दरम्यान गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू होती. देवगाव ला 37 मिमी, ब्राम्हणगावला 35 मिमी, सोनेवाडी 7 मिमी, राहाता 51 मिमी, रांजणगाव 32 मिमी, चितळी 35 मिमी, असा पाऊस काल सकाळ पर्यंत मागील 24 तासात नोंदला गेला. काल दिवसभरात रिपरिप सुरू होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...