Wednesday, July 24, 2024
Homeनगरदर्शनपास विक्रीची चौकशी करून महिनाभरात गुन्हे दाखल करणार

दर्शनपास विक्रीची चौकशी करून महिनाभरात गुन्हे दाखल करणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

जादा पैसे घेऊन आरती, दर्शनपास विक्रीद्वारे भाविकांची फसवणूक करणार्‍या प्रकाराची चौकशी करून संबंधित माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन शिर्डी पोलिसांनी दिले. यानंतर माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सुरू केलेले उपोषण सोमवारी पाचव्या दिवशी सोडले.

शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने भाविकांना आरतीला पुढे उभे करण्याचे आमिष दाखवून एजंटांच्या माध्यमातून जादा दराने पास विक्री करण्याचे प्रकरण गेल्या पंधरवड्यात गाजले होते. संस्थान प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र संबंधिताचे नाव उघड करून गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सगळ्याच माजी नगरसेवकांकडे संशयाने पाहिले जात होते़ यामुळे आरणे यांनी या प्रकाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.

दरम्यान आरणे यांची प्रकृती खालावली तरी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्वभुमीवर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भुजबळ व प्रकाश पगारे यांनीही सोमवार दुपार पासून आमरण उपोषण सुरू केले होते. दुपारनंतर राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी संस्थानचे डेप्युटी सीईओ तुकाराम हुळवळे यांची भेट घेतली. त्यानंतर घडामोडींना वेग आला. साईभक्तांना पास विक्री संदर्भात संस्थानने पोलिसांत लेखी तक्रार दिलेली आहे.

यावर पोलिसांनी महिनाभरात चौकशी करून कारवाई करण्याची लेखी हमी दिल्यानंतर रूपवते व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याहस्ते लिंबूपाणी घेऊन हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, संस्थानचे सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सचीन चौगुले, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, अ‍ॅड़ विक्रांत वाकचौरे, प्रकाश पगारे, दिगंबर कोते, सुनील परदेशी, नाना काटकर, प्रविण अल्हाट, ज्ञानेश्वर हातांगळे, गिरीश सोनी आदींची उपस्थिती होती. तीस दिवसांत योग्य कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा चौगुले यांनी दिला आहे. शहर व परिसरातील विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या