Wednesday, July 24, 2024
Homeनगरदत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत लक्षवेधी लढती

दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत लक्षवेधी लढती

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

- Advertisement -

तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज नेते मंडळी उतरल्याने सदस्य पदासाठी मोठ्या अटीतटीच्या लढती पहावयास मिळणार आहे. राजकीय रिंगणातून कोणाची विकेट पडणार याकडे ग्रामस्थांसह तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विखे गट मोठ्या ताकदीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरपंच पदाच्या लढतीत थेट उडी न मारता दिग्गज मंडळीमध्ये सदस्य पदासाठी कडवी झुंज होणार आहे.

ग्रामपंचायत सदस्याच्या सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग क्र.-3 मधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांचा थेट सामना ससाणे गटांकडून हिरामण जाधव यांच्याशी असल्याने तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेले व महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिंदे यांच्यासमोर जाधव यांची राजकीय आखाड्यात मोठी झुंज होणार आहे. तर माजी लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ यांनी ससाणे गटाकडून प्रमाणिकपणे त्यांच्या पत्नीचा सरपंच पदाच्या उमेदवारीचा अर्ज माघारी घेत एकनिष्ठ असल्याचे सिध्द करून ससाणे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सारीका कुंकूलोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिरसाठ यांची लढत मागील पंचवार्षिक निवडणुकीतील सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार व आता विखे गटाकडून सागर भोसले यांच्याशी असून मागील निवडणुकीत भरघोस मते घेऊन सत्ताधारी पक्षासह विरोधकांना हादरून टाकले होते.

ही लढत अनुसूचित जाती प्रभाग क्र.-3 मध्ये तिरंगी असून वंचितचे सनी त्रिभुवन आपले नशीब आजमावत आहेत. तर विखे गटाकडून भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत दत्तनगर परिवर्तन आघाडी स्थापन करून आपली छाप सोडली होती ते विखे गटाला ताकद देत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मगर यांची पत्नी शालिनी मगर यांची लढत स्व. जयंतराव ससाणे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब विघे यांच्या पत्नी आम्रपाली विघे यांच्याशी होत आहे. ही लढत प्रभाग क्र-1 मध्ये अनुसूचित जाती स्त्रीच्या जागेसाठी तिरंगी असून वंचितच्या दर्शना काळे यांना टक्कर देत आहे.

तर आरपीआयचे भीमा बागुल स्वतः प्रभाग क्र. 6 मधून रिंगणात आहेत तर बागुल यांनी विखे गटाला आरपीआयची मोठी ताकद देत त्यांची लढत ससाणे गटाकडून अरुण वाघमारे यांच्याशी आहे. ही लढत चौरंगी असून सचिन खांडरे, विशाल पठारे यांचा या लढतीत समावेश आहे. तर प्रभाग क्र. 3 मधून सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांना ससाणे गटाकडूनच त्यांच्या मातोश्री सोनुबाई लोंढे यांना विखे गटाच्या प्रीती ब्राह्मणे यांचे आव्हान राहणार आहे.

यासह दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मातब्बर नेते मंडळी एकमेकांसमोर रिंगणात उतरल्याने या लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या