पुणे | Pune
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे मंत्री आपआपल्या खात्याचा कारभार पाहण्यात व्यस्त आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आज पुणे जिल्ह्यातील एका क्रीडाप्रसंगी व्हॉलिबॉल खेळताना मंत्री दत्तात्रय भरणे यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळल्याचे दिसून आले. भरणेमामांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हॉलीबॉल मैदानातील इतर सहकाऱ्यांनी लगेचच त्यांना सावरल्याचे पाहायला मिळाले.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडा संकुलचे उद्घाटन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध खेळांचा आनंद क्रीडा मंत्र्यांनी घेतला. हॉलीबॉल खेळण्याची वेळ आली, तेंव्हा सुरुवातीला भरणेंनी व्हॉलीबॉल योग्यरीत्या टोलवला. पण विरोधी बाजूने टोलवलेला व्हॉलीबॉल नेटच्या पुढे आला. त्याचवेळी भरणेंचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. यावेळी भरणे मामा डोक्याला दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावले. व्हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचे डोके आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणेंनी लोखंडी पोलवर धडकण्याच्या आधी स्वतःला सावरले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
यात त्यांना मुक्कामार ही लागला, याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली. तसेच राजकारणात २०१४ साली पडलो, पुन्हा २०१९ ला राज्यमंत्री झालो आणि आत्ता कॅबिनेट मंत्री झालोय, जो पडतो तोच सावरतो, असे म्हणत दत्ता मामा भरणे यांनी काही झाले नाही, असे एका प्रकारे सांगून चांगलीच गुगली टाकली.