नाशिकरोड । प्रतिनिधी
येथील जेलरोड परिसरात असलेल्या एका आजारी इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या मुलीनेही अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. त्यात तिचा दुर्दैव मृत्यू झाला. या घटनेनंतर या दोघांचाही अंत्यविधी एकाच वेळी करण्यात आला. मात्र सदर घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जेलरोड येथील भीमनगरच्या पाठीमागे असलेल्या ब्रम्हगिरी सोसायटीमध्ये राहणारे मारुती वाघमारे हे पत्नी, एक मुलगा, विवाहित एक व अविवाहित एक असे कुटुंब एकत्र राहत होते. त्यांच्या विवाहित मुलीचे दसक भागात घराचे बांधकाम सुरू असल्याने ती लहान मुलांसह पित्याच्याच घरात राहत होती. गुरुवारी सायंकाळी वाघमारे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या परिवाराने मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान घरी असलेल्या त्यांच्या लहान मुलगी प्रीती वाघमारे २७ हिलाही घटना कळताच तिने घरात असलेल्या एका खोलीत स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. घरात असलेल्या एका लहान मुलीला कळताच तिने आरडाओरड करीत घरच्यांना सांगितले. लागलीच भाऊ सचिन याने तिला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. ती सुमारे ८० टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान दोन्ही बापलेकीची अंत्ययात्रा सायंकाळी काढून शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपमहानिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा