Monday, June 17, 2024
Homeनगरमुलगी झाली हो! लक्ष्मी आली हो!

मुलगी झाली हो! लक्ष्मी आली हो!

आश्वी |वार्ताहर| Ashwi

- Advertisement -

स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणार्‍या मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी व ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने होते हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीवर मात करत संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल खेमनर कुटुंबियानी आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत जल्लोशात करत सुखद धक्का दिला. यावेळी आपल्या कन्यारत्नाची फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढून धुमधडाक्यात स्वागत केल्यामुळे उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईक भारावून गेले होते.

मुलगी झाली म्हणून नाराज होणारा वर्ग आता खेड्यात सुद्धा राहिलेला नाही. उंबरी बाळापूर येथील प्रगतिशील शेतकरी कुटुंबातील व सध्या लोणी पोलीस ठाण्यात साहय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले सुखदेव दशरथ खेमनर यांचा मुलगा महेश खेमनर व सून नम्रता महेश खेमनर हे दोघेही उच्च शिक्षित असून त्यांना नुकतेचं कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे अती आनंद झालेल्या खेमनर कुटुंबाने स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने घरात स्वागत करताना रांगोळ्याच्या पायघड्या, औक्षण व मिठाईचे वाटप करून राजेशाही थाटात आपल्या कन्येचे स्वागत केल्याने उंबरी बाळापूर येथिल ग्रामस्थांसह नातेवाईक व मित्रपरिवाराचेही डोळे दिपून गेले होते. मुलगा-मुलगी असा भेद न करता समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम यानिमित्ताने शोभा खेमनर, संजय सोर, आशा सोर, वनश्री पोमनर, ज्ञानेश्वर पोमनर आदी खेमनर कुटुंबातील सदस्यांनी केले आहे.

यावेळी आपल्या लेकींचा गृहप्रवेश करताना मुलींची पावले कुंकूच्या पाण्यात ठेवून खेमनर कुटुंबाने घरात आगमन केले. आजोबा सुखदेव खेमनर हे पोलीस दलात कार्यरत असले तरी त्यांच्यातील आजोबाने आपल्यातील कणखर स्वभावाला बाजूला ठेवून आपल्या नातीच्या आगमनावेळी फुलांचा वर्षाव करत स्वागत केल्याने तेथे उभ्या असलेल्या प्रत्येकाचे डोळे आपोआप पाणावले होते.

स्त्री-पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी, आज लग्नाला मुली मिळत नाही. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या घरी लक्ष्मी आली. तिचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. पुरुष करतात ती सर्व कामे स्त्रिया काकणभर सरसपणे करतात. मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवायला हवे. त्याला उच्च शिक्षण, चांगले आरोग्य व चांगले भविष्य देण्याचा नेटाने प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तृत्वातून त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नाही.

-सुखदेव खेमनर (आजोबा), सहाय्यक फौजदार लोणी पोलीस स्टेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या