अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दावोस येथे झालेल्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या करारांपैकी दोन करार अहिल्यानगर जिल्ह्यात कोट्यवधीच्या गुंतवणुकीचे झाले आहेत. दोन कंपन्यांनी अहिल्यानगर येथे त्यांचे प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवली आहे. या दोन कंपन्यांची ही गुंतवणूक 1 हजार 539 कोटी रुपयांची असून, या दोन्ही कंपन्यांतून सुमारे 1 हजार 650जणांना रोजगार मिळणार आहे. अन्न व पेये तसेच अॅल्युमिनियम व मेटल्स निर्मितीच्या या कंपन्या आहेत.
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दावोसमध्ये गुंतवणूकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यात नगर जिल्ह्यासाठी दोन करार झाले आहेत. दावोसमध्ये झालेल्या 61 गुंतवणूक करारांपैकी दोन करार अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंतवणुकीचे आहे. यापैकी पहिला करार श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या सिलॉन बिव्हरेज कंपनीचा आहे. ही कंपनी अन्न आणि पेये या क्षेत्रात 1 हजार 39 कोटीची गुंतवणूक करणार आहे.
या कंपनीद्वारे 450 जणांना रोजगार मिळणार आहे. ही कंपनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी येथे त्यांचा प्रकल्प उभारणार आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूक करणारी टॉरल इंडिया ही दुसरी कंपनी असून तिचे क्षेत्र अॅल्युमिनियम आणि मेटल्सचे आहे. या कंपनीची गुंतवणूक 500 कोटीची असून, या कंपनीत 1200जणांना रोजगार मिळणार आहे. ही कंपनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या भागात त्यांचा प्रकल्प टाकणार हे अजून निश्चित नसले तरी सुपा एमआयडीसी किंवा नव्याने होत असलेल्या विळद घाट, शिर्डी, श्रीगोंदे वा कर्जत एमआयडीसीत प्रकल्प उभारण्याचे पर्याय त्यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येते. या दोन्ही कंपन्यांना त्यांचे प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारसह स्थानिक जिल्हा प्रशासनही आवश्यक ते सहकार्य करणार आहे.