मुंबई | Mumbai
केंद्र सरकारने (Central Government) कांद्यावर (Onion) २० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) तीव्र संतप्त झाले असून शेतकऱ्यांकडून विविध ठिकाणी रास्ता रोको आणि कांद्याचे लिलाव बंद पाडले जात आहेत. शेतकऱ्यांच्या याच मागणीची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना एक पत्र लिहिले आहे.
अजित पवारांनी या पत्रात म्हटले की, राज्यात विशेष करुन नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आजमितीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतलेले आहे. अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे.
सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी २४०० रुपये अत्यल्प दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे.लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान (Damage) टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. जेणेकरून लांल कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत चांगले दर मिळतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदार (NCP MLA) नितीन पवार, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज आहिरे यांच्यासह आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालण्याची तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पवार यांनी थेट केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पत्राच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.