मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत (Vidhansabha) अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे आभार मानले. अर्थसंकल्प सादर करताना ज्याप्रमाणे त्यांनी काव्यांचा आधार घेतला होता, त्याचप्रमाणे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतानाही त्यांनी काव्यांजली सादर करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीत या, मुख्यमंत्री करू, अशी ऑफर दिली होती. त्यावरुनही अजित पवारांनी टोला लगावला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की,”आपण सर्वांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या देशाच्या पंतप्रधान महोदयांनी एक “लक्ष्य” ठरवलेले आहे. २०४७ पर्यंत आपला देश हा विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसलेला असेल. महाराष्ट्र, विशेष करुन मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. नेहमीच महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र सर्वांपेक्षा जास्त योगदान देईल, हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळेच “विकसित भारत, विकसित महाराष्ट्र” हा मी १० मार्चला सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “काहीजण उगाच काहीही बोलतात, आमच्याकडे या मुख्यमंत्री (CM) करू म्हणतात. पण, तुमच्याकडं माणसंच नाहीत. तुमच्याकडे १५-२० टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणतात. पण, पुढील पाच वर्ष या सरकारला ब्रम्हदेव आला तरी धक्का लावू शकत नाही. आम्ही नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी देखील आमच्यात एकी असल्याचं सांगत आलो आहे. आमच्यात वाद नसल्याचेही सांगितले आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला काहीही अर्थ नाही”, असेही अजित पवारांनी म्हटले.
तर जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलतांना अजित पवार म्हणाले की,”जयंत पाटील नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून उपरोधिकपणे झालर देण्याचा प्रयत्न करतात. सर्व मंत्र्यांना आता अजित पवारांना शरण गेल्याशिवय पर्याय नाही, असं ते म्हणालेत. मात्र, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते. अर्थमंत्री अर्थसंकल्प (Budget) सादर करतात, तेव्हा बाकीच्या मंत्र्यांनी त्यांना शरण जायचे असते का? त्यामुळे अशा शब्दांचा उल्लेख करणं बरोबर नाही”, अजित पवारांनी सांगितले. एकंदरीत हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर ‘बडा घर पोकळ वासा’, ‘मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी’ असंही काहीजण म्हणाले. पंरतु, काही लोकांनी अर्थसंकल्प विचार करून सादर केलेला व संतुलित आहे, अशीही प्रतिक्रिया दिली”, असेही त्यांनी म्हटले.
तसेच “करोनात (Corona) आपण काही योजना, सवलती सुरु केल्या. त्या करोना संपल्यावर बंद कराव्या लागल्या. काही वेळा केंद्र शासनाकडून राज्याकडील योजनेप्रमाणेच लाभ देणारी नवीन योजना येते. डबल योजना नको म्हणून आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून आपली योजना आपण बंद करतो, यात काहीचं चुकीचं नाही. यापूर्वीही हे अनेकवेळा झालेलं आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, असा गैरसमज पसरवू नका, असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, यावेळी अजित पवारांनी काही चारोळी देखील सभागृहात ऐकून दाखवली. त्यांच्या या चारोळीवर अनेकांनी मनमुराद दादही दिली.
१) जिसे, निभा ना सकू, ऐसा, वादा नहीं करता
मै, बातें, अपने ताकत से, ज्यादा, नहीं करता
तमन्ना रखता हु, आसमान, छु लेने की,
लेकीन, औरोंको, गिराने का, इरादा नहीं रखता.
२) ऐकल्या, शिव्या दुनियेच्या,
जाहली, जरी बदनामी,
हे काय, कमी मजसाठी
मी तुम्हा, आवडलो आहे!