मुंबई | Mumbai
येथील स्वारगेट बसस्थानकातील (Swargate Bus Stand) एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर (Young Woman) बुधवारी (दि.२६) रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याचार झाल्याची घटना घडली. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत.
या घटनेनंतर राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विरोधक राज्य सरकारविरोधात (State Government) आक्रमक झाले आहेत. अशातच आता या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की,”पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत”, असे त्यांनी म्हटले.