अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तुम्ही जशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसता, त्यातील काही तुम्हाला चांगल्या दिसतात. तसेच जॅकेट आणि गुलाबी रंग मला चांगला दिसतो, असे काही जणांनी सांगितले. म्हणून मी ते वापरण्यास सुरूवात केली. दुसरे विशेष काहीही कारण नाही, असे सांगत आपल्या आवडीनुसार आपण काम करायचे, मात्र, ते दुसर्याला त्रासदायक ठरू नये, असे दिलखुलास उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये दिले. गुलाबी रंगाच्या जॅकेटविषयी त्यांना एका महिलेने नगरमध्ये प्रश्न विचारला होता.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी आपला वाढदिवस वेगळ्या पध्दतीने साजरा केला. सकाळीच त्यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांनी त्यांना पांढर्या रंगाचे गुलाबाचे फूल दिले. त्याचे सोशल मीडियातून कौतूक केल्यानंतर तेच गुलाबाचे फूल आपल्या कोटाला लावून ना. पवार दौर्यावर निघाले. सकाळी पारनेर आणि दुपारी नगर शहरात त्यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहिणसह महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती देत राज्यातील कष्टकरी महिलांना आर्थिक सक्षम करणार असल्याचे सांगितले.
सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या विविध योजना सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीच्या आमदारांना निवडून द्या, या सर्व योजना पुढे सुरू ठेवण्याचा वादा मी करतो, असे आवाहनही केले. यावेळी नव्याने सुरू केलेल्या गुलाबी रंगाच्या बॅनर, पोस्टर, जॅकेटसह स्टेजवर एकट्यानेच बसण्याची पध्दतही पवार यांच्या कार्यक्रमात दिसून आली. यासंबंधी नगरच्या कार्यक्रमात एका महिलेने गुलाबी रंगासंबंधी प्रश्न विचारला, त्यावेळी पवार म्हणाले, तुम्ही जशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसता, त्यातील काही तुम्हाला चांगल्या दिसतात. तसेच या रंगाचे जॅकेट मला चांगले दिसते काही जणांनी सांगितले. म्हणून मी ते वापरत आहे. दुसरे काहीही कारण नाही, असे उत्तर पवार यांनी दिले.
निळवंडे मीच केले
मागील 30-35 वर्षात आम्ही विकासाचा विचार केला. आताही करीत आहोत व भविष्यातही करणार आहोत, अशी ग्वाही देऊन पवार म्हणाले, नवीन इमारती, तलाव, केटी वेअर, उपसा सिंचन योजना करून नगर जिल्ह्याचा दुष्काळ हटवला. निळवंडे धरणाचे काम मीच त्या खात्याचा मंत्री असताना पूर्णत्वास नेले, मुळा धरणासंदर्भातील प्रश्न सोडवले, असा दावाही पवारांनी केला.
आजोळीचा जिल्ह्यातून सुरूवात
माझे आजोळ हे नगर जिल्ह्यातील असून यामुळे याच जिल्ह्यातून मी संवाद यात्रा सुरू केली असल्याचे सांगत नगर जिल्ह्याशी आपले वेगळे नाते असल्याचे ना. पवार यांनी सांगितले. तसेच माझी लाडकी बहिण योजनेत अर्ज भरून घेणार्या प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 50 रुपयांचा मोबदला देणार असल्याची माहिती दिली.
माझी लाडकी बहिण योजनेत महिला व तिची नणंद वा घरातील मुलगी अशा दोन महिलांचा समावेश आहे. मात्र, एकत्रित कुटुंबात जाऊबाई असल्याने दोन महिलांना लाभ मिळण्यास अडचण होते, अशी तक्रार एका महिलेने केल्यावर, योजना अशी वाढवत राहिलो तर तिला अंत राहणार नाही. पण भविष्यात जावेच्या समावेशाचा विचार करू, अशी ग्वाही पवारांनी दिली. विशेष म्हणजे घरात 2 जावा असतील तर त्यांची दोन रेशनकार्ड करा व दोघी लाभ घ्या, असा सल्लाही दिला.