कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
पहाटे पाचला उठून मी सहा वाजता कामाला लागतो. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आशुतोष कामासाठी मला उठवायला येतो. मतदार संघाच्या विकास कामाबाबत त्याची तळमळ माझ्या सारखीच आहे. तो मला मुलासारखाच असून त्याचे प्रत्येक काम मी करतो. त्यामुळे यापुढेही कोपरगावला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शनिवारी कोपरगाव येथे आली होती. यावेळी झालेल्या जाहिर सभेत अजित पवार बोलत होते. व्यासपिठावर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, सुरज चव्हाण, आ. आशुतोष काळे, माजी आ. अशोकराव काळे, चैताली काळे, संभाजीराव काळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, कृष्णा आढाव, मंदार पहाडे, सुनील गंगुले, विरेन बोरावके, डॉ. अनिरूद्ध काळे, माधवी वाकचौरे, प्रतिभा शिलेदार उपस्थित होते.
ना. पवार म्हणाले, मी सन्मान यात्रा काढण्यापूर्वी सहा हजार कोटी रूपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे. लाडक्या बहिणीसाठीच नाही तर, भाऊ पण लाडका आहे. त्याच्यासाठी वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलरवर 9 हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले आहेत. चंद्राबाबु नायडू आणि नितीशकुमार यांनी त्यांना पाठींबा दिल्यामुळे त्यांच्या राज्याला झुकते माप मिळाले. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार आणावे लागेल. विरोधकांच्या खोट्या-नाट्या प्रचाराला बळी पडू नका. लोकसभेत जे घडले ते विधानसभेत होऊ देऊ नका. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. महायुतीचे सरकार राज्यात परत येणारच आहे. त्यानंतर राज्याचे उर्वरित प्रश्न केंद्र सरकारच्या मदतीने सोडवून विकास करू, असेही पवार म्हणाले.
आशुतोष काळे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपला मोलाचा वाटा असला पाहिजे. अजित पवार यांच्या माध्यमातून पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळविण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यांच्याकडून मतदार संघाचा विकास करण्यासाठी पाच वर्ष मी त्यांना खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळेच कोपरगाव मतदार संघाला तीन हजार कोटींचा निधी मिळाला.