वर्धा | Wardha
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे नेहमी आपल्या खास शैलीतील भाषेसाठी प्रसिध्द आहे. अजित पवार यांची सडेतोड आणि परखड बोलण्याच्या सवय संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. भाषण असेल किंवा पत्रकार परिषद असेल, अजितदादा हे नेहमी थेट आणि स्पष्ट बोलून उपस्थितींची मनं जिंकून घेतात. त्यातच आज अजित पवार वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी दौऱ्यात त्यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी ते निघाले होते. रवाना होत असताना एका कार्यकर्त्याने ‘दादा, आय लव्ह यू’ असे म्हटले. त्यावर दादांनी ही ‘आय लव्ह यू टू असे म्हंटले’ त्यानंतर एकच हश्शा पिकला. अजितदादांनीही हसू आवरलं नाही, हा संपूर्ण प्रकार सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर घडला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

सुनेत्रा पवारांबद्दलच्या विधानाची चर्चा
अजित पवारांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सुनेत्रा पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला, की “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या,” असे सांगत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच, “मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहिती नसते. आपण आत्ताच विचारलेले आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती?” असे खोचक उत्तर अजित पवारांनी दिले.




