Thursday, October 17, 2024
Homeनगरभाजपकडून कोल्हेंची मनधरणी !

भाजपकडून कोल्हेंची मनधरणी !

देवेंद्र फडणवीस यांची स्नेहलता कोल्हे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मातब्बर राजकीय घराणे कोल्हे कुटुंबियांनी महायुतीतील राजकीय अडचण निर्माण झाली असली तरी भाजपसोबतच राहावे, अशी मनधरणी पक्षाकडून सुरू झाली आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या चर्चेदरम्यान मतदारसंघातील कोल्हे कुटुंबातील संभाव्य उमेदवार विवेक कोल्हे मात्र अनुपस्थित असल्याचे समजते.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार आशुतोष काळे अजित पवारांसोबत आहे. यामुळे मतदारसंघात महायुती अंतर्गत राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजपात असलेल्या कोल्हे कुटुंबियांची राजकीय अडचण झाली आहे. काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. कोल्हे यांनी वेगळा निर्णय घेण्यापूर्वीच भाजपने सावधगिरी दाखवत त्यांना पक्षात थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजपच्या माजी प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना चर्चेसाठी मुंबई येथे आमंत्रित केले. कोल्हे कुटुंबियांनी वेगळा निर्णय घेऊ नये यासाठी भाजप ताकद लावत आहे.

स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्याने उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात राजकीय प्रभाव दाखवला होता. कोपरगावसह येवला, सिन्नर व गणेश कारखाना ताब्यात असल्याने राहाता आणि वैजापूर यासह नगर, नाशिक जिल्ह्यात नातेगोत्यांचे जाळे असल्यामुळे कोल्हे कुटुंब भाजपसाठी महत्वाचे मानले जाते.

भुमिका गुलदस्त्यात
दोन दिवसांपासून विवेक कोल्हे हाती ‘तुतारी’ घेणार या चर्चेने जोर धरला आहे. मुंबईतील भेटीमागे हा संदर्भही जोडला जात आहे. मात्र या घडामोडींवर कोल्हे कुटुंबाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे काय भूमिका घेणार? विधानसभा मैदानात कोणत्या पक्षाकडून उतरणार? की भाजपसोबत राहुन काही वेगळे राजकीय गणित मांडणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या