मुंबई | प्रतिनिधी
शिवछत्रपती यांच्या ३५०व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून ( डीपीडीसी) दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ फडणवीस यांनी केला.
यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ आणि स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करित आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
घरोघरी शौचालय उभारणे, हागणदारीमुक्त भारत या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मल-जल शुद्धीकरण सुरु असून, राज्यात २२१ सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्या संदेशानुसार १७ सप्टेंबरपासून सुरू असलेला स्वच्छता पंधरवडा पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.