मुंबई | Mumbai
लोकसभेत (Loksabha) वक्फ सुधारणा विधेयक सादर केल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये (बुधवारी) दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. यानंतर मध्यरात्री या विधेयकावर मतदान (Voting) पार पडले. यावेळी ४६४ मतांपैकी २८८ मते विधेयकाच्या बाजूने तर २३२ मते विरोधात पडली. त्यामुळे या मतदानानंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक अखेर बहुमताने मंजूर (Waqf Amendment Bill) झाले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यावरून भाजपसह मित्रपक्षांकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली जात आहे.
या टीकेला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी विधेयकात काही चांगल्या गोष्टी आहेत. पण आमचा ढोंगीपणाला विरोध आहे. वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेसेना आणि भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की,”मला ‘एसंशिं’ म्हणता तुम्ही ‘यूटी’ म्हणजे यूज अँड थ्रो का?, राहुल गांधींच्या सोबत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते, हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं हे समजत नाही” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. तसेच “मला काम करु द्या, मी शांत आहे तोवर शांत आहे, जास्त बोलायला लावू नका, माझ्याकडे बोलण्यासारखे खूप आहे. मला गद्दार गद्दार बोलले, खोके खोके बोलले. पण २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला लोकांनी खोक्यात बंद केले. त्यांची भूमिका दुटप्पी भूमिका आहे. यांची घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी दिवस होता. ते म्हणतात आमचा वक्फ बिलाला विरोध नाही तर भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे. अतिशय गोंधळलेल्या परिस्थिती काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सूचत नसलेलं आज दिसलं आहे. धरलं की चावतंय आणि सोडलं की पडतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेबांचा पाठिंबा होता. तिच भूमिका आमची आहे, भाजपाची आहे. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना मग ते कोणीही असो त्यांना आमचा विरोध आहे. बाळासाहेब जी भूमिका घेऊन चालले तिच भूमिका या वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) वेळी भाजपानेही (BJP) दाखवली” असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.