सटाणा | प्रतिनिधी Satana
सटाणा नगरपरिषदेच्या चौगांव परिसरातील कचराडेपोत आज बुधवार दिनांक ५ रोजी दुपारी २ वाजता कापडात व प्लॉस्टिक पिशवीत गुंडाळलेले स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली.
सटाणा पोलिसांनी या नवजात अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. दुपारी दोन वाजता सटाणा नगरपरिषदेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचार्यांना संशयास्पद काही तरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी निरखून पाहिले असता कापडात आणि प्लॉस्टिक पिशवीत गुंडाळलेले स्त्री जातीचे मृत अर्भक असल्याचे दिसले. त्यांनी या प्रकरणाची माहिती इतर कर्मचार्यांना दिल्यानंतर पोलिसांना पाचारण केले.
सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत पाहणी केली असता कापडात गुंडाळलेले एक दिवसाचे स्त्री जातीचे हे अर्भक असल्याचे आढळून आले. मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून पोलिसांनी ते फेकणार्या मातेचा शोध सुरू केला असुन या अमानवी कृत्यामुळे शहरात तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.




