Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधआवड शोधा

आवड शोधा

ज्योत्स्ना पाटील

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

- Advertisement -

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आज तुम्ही आपल्या खेळाचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुक असाल. चला तर मग आज आपण प्रथमेशच्या करिअरचा निकाल काय लागतो ते पाहूया! प्रथमेशच्या करिअरचा निकाल काढण्यासाठी आपल्याला तक्ता तयार करावा लागेल. पहिल्या कॉलममध्ये प्रथमेशच्या आवडी लिहूया. दुसर्‍या कॉलममध्ये आवडींची संख्या लिहूया. अशाप्रकारे तक्ता तयार करूया

आवड सदस्य संख्या

गोष्टी ऐकणे-वाचणे 3

पोहणे 2

पक्षी निरीक्षण 3

वस्तू दुरुस्त करणे 5

सायकलिंग 3

मदत करणे 3

संगीत 2

विद्यार्थी मित्रांनो, वरील तक्त्यात सर्वात जास्त आवड सांगणार्‍या सदस्यांची संख्या पाच आहे. पाच सदस्यांनी प्रथमेशला वस्तू दुरुस्त करायला आवडते असे लिहिले आहे. याचाच अर्थ प्रथमेशचे करिअर शोधायचे झाले तर त्याची मुख्य आवड आहे अभियंता होण्याची.

1) मेकॅनिकल इंजिनिअर 2) इलेक्ट्रिकल इंजिनिअर 3) डिझाईन इंजिनिअर 4) उद्योग निर्माता

विद्यार्थी मित्रांनो, यातही इतर छोटे उद्योगधंदे व नोकर्‍या यांचाही समावेश करता येईल. परंतु भविष्यात जर प्रथमेशची आवड बदलली किंवा त्याला या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा न होता, दुसर्‍याच एखाद्या करिअरकडे तो आकर्षित झाला तर आपण आता त्याच्या दुसर्‍या क्रमांकाच्या आवडीकडे वळूया. त्याच्या दुसर्‍या क्रमांकाच्या आवडीत लेखनाशी संबंधित आवड, पक्षीतज्ज्ञ, सायकलिंग, समाजसेवक इ. आवडी आलेल्या आहेत. यावरून असे लक्षात येते की, प्रथमेशला विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. त्याच्या पर्यायी आवडींच्या करिअरविषयीही जाणून घेऊया.

लेखन क्षेत्र – कन्टेन्ट रायटर (आंतरराष्ट्रीय कंपन्या, दूरदर्शन मालिका) कॉपीराइटर(जाहिरात क्षेत्र) अनुवादक, दुभाषी, संपादक, अशा अनेक क्षेत्रासाठी लेखकांची गरज असते.

पक्षीतज्ज्ञ- फोटोग्राफी, पर्यावरण विभाग, पक्षी संरक्षण क्षेत्र, फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा अनेक ठिकाणी कार्य करण्याची संधी.

खेळ – सायकलपटू म्हणून अँथलेटिक्समध्ये करिअर करू शकतो. यातही प्रशिक्षक व सरकारी नोकरी करण्याची संधी.

समाजसेवा – या क्षेत्रात मानवाधिकार संस्था, महिला व बालविकास क्षेत्र, सामाजिक संस्थांमध्ये नोकरी, सोशल वर्कशॉप अशा अनेक संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी मित्रांनो, प्रथमेशला त्याच्या आवडीतून विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळू शकते. तुमची आजची आवड अनेक वेगवेगळ्या अंगांनी भविष्यात बहरू शकते. त्यासाठी आवडींचा खेळ प्रथमेशप्रमाणे खेळत राहा. तुमच्या आवडींचा कल बदलणारा असेल तर दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत त्याविषयी आई-बाबांशी, मित्रांशी चर्चा करीत राहा. प्रथमेश, हा दुसरा-तिसरा कुणी नसून तुमचेच ते प्रातिनिधिक रूप आहे. प्रथमेशच्या आवडींचा निकाल मुख्य आवड व पर्यायी आवडी अशा दोन विभागात केल्या आहेत. तुम्हीही तुमच्या आवडींची नोंद करून ठेवा. प्रथमेशच्या आवडींचा निकाल तर लागला पण आता आपण पुढच्या भागात प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा? ते समजून घेणार आहोत. तेही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातून आणि आवडत्या अभिनेत्रीच्या, आवडत्या गाण्यातून. त्याकरिता तुम्ही ‘पद्मावत’ या चित्रपटातील दीपिका पदुकोन अभिनेत्रीचे ‘घूमर घूमर घूमे’ हे गाणे काळजीपूर्वक पाहून त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसल्या याची यादी करून ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चित्रपटातले गाणे नि आमच्या अभ्यासाचा संबंध काय? अर्थात लवकरच याचे उत्तर मिळेल. तोपर्यंत वाट पाहा.

तुमची,

ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या