मुंजवाड | वार्ताहर Munjvad
मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना भरधाव इको वाहनाने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर तीन महीलांसह एक जण गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. मुंजवाड-खमताने रत्यावर आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेनंतर फरार झालेल्या वाहन चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र उत्साही वातावरण असतांनाच आज पहाटे घडलेल्या या अपघाताने मुंजवाडसह परिसरात शोककळा पसरली आहे. मुंजवाड येथील महीला व नागरीक नेहमी प्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकला जात असतात. आज मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिला व नागरीक सहा वाजता खमातणे येथून परतत असतांना खमताणेकडून सटाण्याच्या दिशेने भरधाव जाणार्या ईको वाहनाने माजी जि.प. सदस्य शैलेश सुर्यवंशी यांच्या मळ्याजवळ पायी चालणार्या सरला राजेंद्र जाधव, संगीता ज्ञानेश्वर जाधव,सुनंदा वसंत जाधव, अंजना खुशाल पगार, वसंत त्रंबक जाधव यांना जोरात धडक दिल्याने हे सर्व फेकले जावून गंभीररित्या जखमी झाले. मात्र अपघातानंतर वाहन चालक फरार झाला.
अपघात घडल्याचे लक्षात येताच निलेश सुर्यवंशी, हेमलता सुर्यवंशी, राजेंद्र जाधव, हर्षवर्धन सुर्यवंशी, गणेश पाटील, संजय जाधव, भिका जाधव, अरुण जाधव, चेतन जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना त्वरीत अपेस रुग्णालयात दाखल केल्याने डॉ. किरण अहीरे व डॉ. प्रविण खैरनार यांनी उपचारास प्रारंभ केला. मात्र डॉ. राजेंद्र जाधव यांच्या पत्नी सरला जाधव ( ४८ ) या गंभीररित्या जखमी झाल्याने मृत झाल्या. तसेच सुनंदा वसंत जाधव (५२) यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. तर संगीता ज्ञानेश्वर जाधव (४८), अंजना खुशाल जाधव (५०), वसंत त्र्यंबक जाधव (५८ ) हे जखमी झाले असल्याने त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
अपघात प्रसंगी सुनंदा जाधव यांची साडी वाहनाला अडकल्याने त्या पंचवीस ते तिस फुट फरफट गेल्या सुदैवाने गाडीला अडकलेली साडी निसटल्यामुळे त्या वाचल्या. अपघातानंतर पळून गेलेला वाहन चालक जीवन माळी (खमताणे) याला पोलीसांनी अटक करीत वाहन क्र. एम.एच.-४३. ए.एन.-१०४४ जप्त केले आहे. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. योगेश पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
अपघातातील मृत सरला जाधव यांच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा, एक मुलगी, नातू असा परिवार आहे. दुपारी मुंजवाड येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा बंधना निमीत्ताने मुलगी माहेरी आलेली होती. आज ती सासरी जाणार होती मात्र काळाने झडप घालुन आईला हिराकून नेल्याने मुलीला हा दुःखद प्रसंग पाहावा लागल्याने नातेवाईक शोकाकुल झाले होते.





