Tuesday, December 10, 2024
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसापुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रविण सारूक्ते या ११ वर्षीय बालकाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राण ज्योत मालवली. नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

- Advertisement -

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या १३० अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. काल मध्यरात्री ३ वाजेपर्यंत वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र यश आले नाही. तर शनिवारी सकाळपासून वनविभागाने श्वान पथक, ड्रोन कॅमेरा व्दारे पुर्ण परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही.

वनविभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी आवाहन केले आहे की, बिबट्या हा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे. त्यामुळे तो चवतळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्यामागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावु नये. त्यामुळे बिबट्याला जेर बंद करण्यास अडचणी येणार असुन गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी गावातील नागरिकांनी जंगलात जाऊन आग लावु नये, नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये व बिबट्याला जखमी करू नये आणि वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल व आपला परिसर भय मुक्त होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान आता पर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असुन ६ वनविभागाचे कर्मचारी व ६ ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे लावले आहेत. या मोहिमेत इगतपुरी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपारिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे, भाऊसाहेब राव, पोपट डाणगे, एफ जी सय्यद, नितीन गांगुर्डे, विठल गांगुर्डे, गोरख बागुल, प्रकाश साळुंखे, मंदा पवार, मालती पालवी, कावेरी पाटील आदी कर्मचारी बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या