Tuesday, June 17, 2025
Homeब्लॉगवन्यप्राण्यांच्या मरणकळा!

वन्यप्राण्यांच्या मरणकळा!

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार 2012 ते 15 जुलै 2022 पर्यंत 1059 वाघांचा विविध अपघातात बळी गेला आहे. यात सर्वात जास्त म्हणजे 270 वाघ मध्य प्रदेशात तर 183 वाघांचा बळी महाराष्ट्रात गेला आहे. जंगले नष्ट करून त्या ठिकाणी नवीन शहरे वसण्यात येत असल्यामुळे वन्यप्राण्यांवर निवार्‍याचे संकट ओढवत आहे. बेकायदा शिकारीवर अंकुश ठेवून शिकार्‍यांना धाक बसेल असे आणखी कडक कायदे निर्माण करून त्यांची कठोर अंमलबजावणीही करणे आवश्यक आहे. सोबतच वन्यप्राण्यांविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलणेही गरजेचे आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार 2012 ते 15 जुलै 2022 पर्यंत 1059 वाघांचा विविध अपघातात बळी गेला आहे. यात सर्वात जास्त म्हणजे 270 वाघ मध्य प्रदेशात तर 183 वाघांचा बळी महाराष्ट्रात गेला आहे. शिकार, अनैसर्गिक आणि नैसर्गिक या कारणांमुळे वाघांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात मागील सहा महिन्यांत 27 वाघांचा बळी गेला आहे.

याचप्रकारे 2019 ते 2021 च्या मध्यापर्यंत शिकार, विजेचा शॉक, विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे आणि रेल्वेची धडक बसून अपघातात बळी गेलेल्या हत्तींची संख्या तब्बल 307 इतकी आहे. अशाच प्रकारे रेल्वेखाली सापडून ओडिशात 12, पश्चिम बंगालमध्ये 11 आणि इतर राज्यांमध्ये 22 हत्तींचा नाहक बळी गेला आहे. तर 29 हत्तींची शिकार केली गेली आहे. तसेच विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे बळी गेलेल्या हत्तींची संख्या 11 होती. वाघ आणि हत्तींच्या शिकारीमागे तस्करी हे महत्त्वाचे कारण आहे. वाघांचे चामडे आणि हस्तीदंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वाघ आणि हत्तींची शिकार करून बेकायदेशीररीत्या तस्करी केली जाते.

- Advertisement -

मागील पाच वर्षांत वाघांच्या शिकारीवर काही प्रमाणात नियंत्रण जरूर मिळवले गेले आहे. मात्र, ज्याप्रकारे वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, ती रोखणे खूप मोठे आव्हान आहे. वाघांच्या संरक्षणासाठी दरवर्षी प्रयत्न केले जातात. मात्र, इतके प्रयत्न करूनही देशात दरवर्षी सरासरी 98 वाघांचा बळी जातोच. विशेष म्हणजे 2018 च्या वाघ जनगणना अहवालानुसार, देशात 2,967 वाघ होते. मात्र विविध अपघातात आणि शिकारीमुळे मागील साडेचार वर्षांत 404 वाघांचा बळी गेला आहे. यात वाघांच्या नैसर्गिक मृत्यूच्या संख्येचाही समावेश आहे. मात्र, तरीही वस्तुस्थिती अशी आहे की, बेसुमार वृक्षतोड, ढासळते पर्यावरण संतुलन, शिकार आणि जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप यामुळेच वन्यप्राण्यांवर संकट ओढवले आहे.

वाघांची संख्या केवळ भारतातच घटत चालली आहे असे नव्हे, तर जागतिक स्तरावरही वाघांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे वाघांची संख्या सध्या केवळ 3900 इतकी कमी आहे. वाघांची घटती संख्या पाहता आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संरक्षण संघ (आययूसीएन)ने आपल्या लाल सूची (रेड लिस्ट)मध्ये वर्षे 1969 मध्येच वाघांचा नामशेष होणार्‍या वर्गात समावेश केला होता. त्यानुसार वाघांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम असा झाला की, वाघांच्या संरक्षणासाठी 2010 मध्ये सेंट पिटर्सबर्ग येथे आंतरराष्ट्रीय वाघ संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी वाघांच्या घटत्या संख्येवर विस्तृत चर्चा करण्यात आली होती. तेव्हापासून जगभर वाघांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेतली जाऊ लागली. विशेषतः भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमारसह तेरा देशांनी 2022 च्या शेवटी आपल्या देशाच्या सीमांतर्गत भागात वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. विशेष म्हणजे 2018 पर्यंत भारत या लक्ष्याच्या जवळपास 74 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. 2010 मध्ये भारतात 1706 वाघ होते, 2014 मध्ये ही संख्या वाढून 2226 आणि 2018 मध्ये आणखी वाढून 2967 एवढी झाली होती.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. जंगल सुरक्षा, जैवसाखळीचे संतुलन आणि वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीनेही वाघांचे संरक्षण गरजेचे आहे. केंद्र सरकारद्वारे वाघांच्या संरक्षणासाठी कायद्याशिवाय अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र, अजूनही यासाठी भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मागील दहा वर्षांमध्ये वाघांच्या हल्ल्यात बळी जाणार्‍यांची संख्या 125 इतकी आहे. यामागचे कारण म्हणजे स्वसंरक्षणाकरता वाघांना मारून टाकण्याची लोकांची प्रवृत्ती असते. लोकांचा हाच दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून हत्तींना वाचवण्याचेही आव्हान आहे.

मागील दहा वर्षांत हत्तींचीही संख्या झपाट्याने कमी झालेली आहे. सरकारला वाघांसोबतच हत्तींनाही शिकार, रेल्वे अपघात यापासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. जंगले नष्ट करून त्या ठिकाणी नवीन शहरे वसण्यात येत असल्यामुळे वन्यप्राण्यांवर निवार्‍याचे संकट ओढवत आहे. आपत्तींवर मात करून बेकायदा असलेल्या शिकारीवरही निरंकुश ठेवून शिकार करणार्‍यांना धाक बसेल असे आणखी कडक कायदे निर्माण करून अंमलबजावणीही करणे आवश्यक आहे. यासोबतच वन्यप्राण्यांविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलणेही गरजेचे आहे. यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून योजना निर्माण केल्या जातात. मात्र, यात नागरिकांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळेच मागील चाळीस वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने हत्ती, सिंह, बिबट्या, वाघ, हरीण आणि अस्वलांचा अपघात आणि शिकारीत बळी गेला आहे. बदलत्या काळानुसार वन्यप्राण्यांबद्दल लोकांचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलला असला आणि वन्यप्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी बेसुमार वृक्षतोड, वातावरणात होणारा बदल या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मरणकळा संपलेल्या नाहीत.

खरेतर वन्यप्राण्यांविषयी लोकांच्या मनात भीतीची भावना असते. विशेषतः शहर किंवा गाव जर जंगलाशेजारीच असेल तर तेथील रहिवाशांच्या मनात दहशत असते. त्यामुळे शिकार्‍यांना पकडून देण्यात स्थानिक लोक पोलिसांची मदत करत नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वन्यप्राणी सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा भाग नसतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांसारखी मैत्री वन्यप्राण्यांशी नसते. साहजिकच वन्यप्राणी वस्तीत दिसताच घबराट निर्माण झाल्याने त्याला मारण्याचाच प्रयत्न आधी केला जातो. त्यामुळे अनेक वन्यप्राण्यांच्या हत्येची माहिती ना वन्यविभागाला असते ना पोलिसांना.

ही परिस्थिती बदलली पाहिजे. वन्यप्राण्यांविषयी लोकांचा द़ृष्टिकोन बदलला पाहिजे. वन्यप्राण्यांविषयी वाटत असलेली भीती, घृणा मनातून काढून टाकली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारलासुद्धा वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करणारी मोहीम चालवणे आवश्यक आहे. अशी आशा करूया की, केंद्र सरकार, वन्यप्राणी संरक्षक आणि नागरिकांच्या मदतीने शिकार्‍यांना पकडणे, अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि विषारी पदार्थ खाण्यापासून वन्यप्राण्यांना वाचवण्यात यश मिळवू शकू आणि निसर्गातील या अनमोल वन्यप्राण्यांचे पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करू शकू.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या