मनमाड । प्रतिनिधी Manmad
रेल्वेच्या जनरल डब्यात जागा नसल्याने दरवाज्यात उभे राहून प्रवास करणारा तरुण धावत्या रेल्वेतून पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रवक घटना मनमाडपासून जवळच असलेल्या रापली येथे घडली. जनरल डब्यात वाढत्या गर्दीने या तरूणाचा बळी घेतल्याचे बोलले जात असून एका महिन्यात ही दुसरी घटना घडल्याने जनरल डब्यांची संख्या कमी करून रेल्वे प्रशासन आणखी किती निरापराध प्रवाशांचा बळी घेणार आहे? असा प्रश्न संतप्त प्रवाशांतर्फे करण्यात आला आहे.
सचिन कैलास हजारे (21, रा. मुदलवाडी, ता. पैठण) हे त्या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबई येथून छत्रपती संभाजी नगरकडे सचिन जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका महिन्यात ही दुसरी घटना असून रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण डब्यांची संख्या वाढवावी अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान खान, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, सचिन हजारे हा तरुण मामाचे निधन झाल्यामुळे मुंबईला गेला होता. तेथून देवगिरी एक्सप्रेसने परत गावी जात होता मात्र जनरल डब्यात इतकी गर्दी होती कि पाय ठेवायला देखील जागा नव्हती त्यामुळे तो दरवाज्यात बसला होता. रात्री तोल जाऊन तो मनमाडच्या रापली गेटजवळ धावत्या गाडीतून पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रवासाचे सर्वात स्वस्त साधन रेल्वे मानली जाते. गाव खेड्या पाड्यासाठी पॅसेंजर तर छोट्या-मोठ्या शहराला जाण्यासाठी मेल, एक्सप्रेस गाड्या आहेत. काही वर्षा पूर्वी मेल आणि एक्सप्रेस गाड्यात 12 ते 14 डबे असायचे त्यात एसीचे 3 किंवा चार डबे तर उर्वरित डबे जनरल आणि स्लीपर असायचे. कालांतराने दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत काशी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, पंजाब मेल, दादर-अमृतसर एक्स्प्रेस, दानापूर-पुणे एक्सप्रेस यासह जवळपास सर्वच गाड्यात डब्यांची संख्या वाढवून ते 22 ते 24 करण्यात आली आहे त्यासाठी प्लॉट फार्मची लांबी देखील वाढविण्यात आली असून एकीकडे गाडीत डब्यांची संख्या वाढली असताना दुसरीकडे मात्र जनरल आणि स्लीपर डब्यांची संख्या कमी करून त्याजागी एसी कोच वाढविण्यात आले आहे.
देशातील 70 टक्के पेक्षा जास्त जनता ग्रामीण भागात राहते. शहरात राहणार्यांमध्ये देखील मध्यमवर्गीयाची संख्या जास्त असून ते सर्वसाधारण किंवा स्लीपर डब्यातून प्रवास करतात. आता सर्वच रेल्वेत दोन ते तीनचं डबे जनरल असतात. पूर्वी स्लीपर डब्याची संख्या 12 ते 14 असायची मात्र त्यातही कपात करण्यात आली असून आता फक्त 5 ते 6 स्लीपरचे डबे ठेवण्यात आले आहे. एसीचे भाडे सर्वसामान्य आणि गोरगरीबाच्या आवाक्याबाहेर असून जनरलचे डबे दोन ते तीन असतात त्यामुळे डब्यांची संख्या कमी तर प्रवासी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून दरवाज्यात लटकून प्रवास करण्याची वेळ प्रवाशावर आली असल्याने त्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे आम्ही प्रवास करायचा तरी कसा? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
कोचसाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे
रेल्वे प्रशासनाने जनरल डबे आणि स्लीपर कोच वाढविण्याची गरज असताना ते कमी करून एसीचे कोच वाढविले आहे. त्यामुळे विमाना प्रमाणे रेल्वे देखील श्रीमंताची होत चालली असल्याचा अनुभव येत आहे बहुतांश रेल्वे गाड्यामधून जनरल सोबत स्लीपर डब्यांची संख्या कमी करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेने प्रवास करणे अवघड झाले आहे. आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन जनरल आणि स्लीपर कोचची संख्या वाढविण्याची मागणी केली असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.