चांदवड | प्रतिनिधी chandwad
तालुक्यातील दहिवद शिवारातील विहिरीत पडलेले बकरू काढण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार (दि. २१) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
आर्यन बन माळी (१७, रा. दहिवद शिवार, ता. चांदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्यन हा शुक्रवारी सकाळच्या सुमारास दहिवद शिवारात बकऱ्या चारत असताना त्यातील एक बकरू विहिरीमध्ये पडले. त्यामुळे त्या बकरुला काढण्यासाठी आर्यन हा विहिरीमध्ये उतरला असता विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने विहिरीत गळ टाकून त्यास विहिरीतून बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीत चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाच्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
याबाबतची खबर दीपक पुंजाराम माळी (रा हिरापूर ता. चांदवड) यांनी चांदवड पोलिसात दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्निल रंधे करीत आहेत.