मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे गरजू रुग्णांना जिल्हा पातळीवरच सहकार्य उपलब्ध होणार असून, अर्जांच्या पाठपुराव्यासाठी त्यांना मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यासंदर्भात २२ जानेवारी रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाणार असून, नागरिकांना आपल्या अर्जाची स्थिती सहज तपासता येईल.
समस्यांचे निराकरण जलद गतीने होण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. वेळ आणि आर्थिक खर्चात बचत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.