Saturday, October 5, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात दुष्काळ जाहीर करा

नंदुरबार जिल्हयात दुष्काळ जाहीर करा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जुलै महिना संपत आला तरीही अद्याप पाऊस नसल्याने नंदुरबार जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी पत्रकार परिषदेत केली.

- Advertisement -

(BJP) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या युवा वॉरीअर्स अभियानांतर्गत आज श्री.बावनकुळे हे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे युवा वॉरिअर्स अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यातील सर्व युवा व युवतींचे संघटन करण्यात येणार आहे.

या अभियानात २५ लाख युवांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात युवकांचे अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या युवकांचे संघटन करुन त्यांना शिक्षणासोबतच रोजगार कसा उपलब्ध होेईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. भाजपाचा केवळ राजकारण करणे हा उद्देश नसून युवकांचे स्किल जाणून त्यांना ज्या क्षेेत्रात रस असेल त्याबाबत त्याला मार्गदर्शन करुन आत्मनिर्भर कसा बनेल यासाठी युवा वॉरिअर्स हा प्लॅटफॉर्म आहे.

श्री.बावनकुळे म्हणाले, जुलै महिना संपत आला तरीही नंदुरबार जिल्हयात अद्याप पाऊस नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर संकट आले आहे. त्यांना पिक विमाचा लाभ तसेच पिककर्जदेखील मिळत नाही. जिल्हयाच्या पालकमंत्र्यांना त्यांच्या मतदार संघाशिवाय इतरांशी काही देणेघेणे नाही, त्यामुळे नंदुरबार जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात चाळीस लाख शेतकरी आहेत, मी उर्जामंत्री असतांना २८ हजार कोटींची वीज शेतकर्‍याना दिली होती. मात्र या सरकारने भर पावसाळयात लाखो शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणाबाबत श्री.बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांंमध्ये ओबीसींचे नुकसान झाले आहे. याला फक्त राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण या सरकारला आरक्षणच द्यायचे नाही.

२०२२ पर्यंत अनेक छोटया मोठया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. यात त्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचे नसल्यामुळे सरकारने इम्पीरिकल डाटा सादर केला नाही. मात्र, राज्य सरकारने येत्या तीन महिन्याच्या आत ओबीसींचा इम्पीरिकल डाटा सुप्रिम कोर्टात सादर केला नाही तर सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधींच्या गाडया रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराही श्री.बावनकुळे यांनी दिला. यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, दि.१९ जुलैपासून भाजयुमोतर्फे संघटनात्मक बांधणीसाठी युवा वॉरीअर्स हे अभियान सुरु केला आहे. सात दिवसांच्या या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यात नाशिक, धुळयानंतर आज नंदुरबार जिल्हयात आलो आहेत.

राज्यात युवा, तरुणांचे प्रश्‍न मोठया प्रमाणावर आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वर्षभरात १९ आंदोलने करण्यात आली आहेत. ही युवकांसाठी दुर्दैवाची बाब आहे. या अभियानांतर्गत १८ ते २५ वयोगटातील २५ लाख युवा, युवतींना जोडण्यात येणार आहे. कारण प्रत्येक युवक हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु शकत नाही. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हे अभियान सुरु केले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, संघटनात्मक प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, सरचिटणीस अनुप मोरे, राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या