Saturday, May 4, 2024
Homeनाशिकऑक्सिजन साठवणूक टँकचे लोकार्पण

ऑक्सिजन साठवणूक टँकचे लोकार्पण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहर व तालुक्यातून करोना हद्दपार व्हावा यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे. दुसर्‍या लाटेत भासलेली ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी ऑक्सिजन साठवणूक करणारा प्रकल्प पुर्ण झाला असून ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या प्रकल्पाचे काम अिंंतम टप्प्यात आहे. 20 के.एल. क्षमतेच्या या साठवणूक टँकमुळे रुग्णांना ऑक्सिजन टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.

- Advertisement -

येथील सामान्य रुग्णालयात कृषिमंत्री दादा भुसे( Agriculture Minister Dada Bhuse ) यांच्या अथक पाठपुराव्यामुळे 20 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ऑक्सीजन टँकचे इस्टोलेशनचे काम पुर्ण होवून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली जावून हा साठवणूक टँक रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आला. त्याचे लोकार्पण कृषिमंत्री दादाजी भुसे, मालेगाव मध्यचे आ. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भुसे बोलत होते.

करोना(corona) संकट अद्याप टळलेले नाही. संभाव्य तिसर्‍या लाटेचे संकट दिसून येत असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या असून संक्रमण फैलावू नये, यास्तव निर्बंध अधिक कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत.

जनतेने देखील कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच मास्कचा वापर व सुरक्षित अंतर राखण्याचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन करीत कृषिमंत्री भुसे पुढे म्हणाले. दुसर्‍या लाटेत भासलेली ऑक्सीजनची कमतरता लक्षात घेत सामान्य रूग्णालयात ऑक्सिजन साठवणूक करणार्‍या 20 के.एल. सुमारे 20 हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन साठवणूक टँक उभारण्यात आला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन हा टँक कार्यान्वित करण्यात आल्याने तो रुग्णसेवेत मोलाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साठवणूक टँकबरोबरच हवेपासून ऑक्सिजन(oxygen) निर्मिती करणारा प्लान्ट देखील मंजूर करण्यात आला असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने लवकरच हा प्लान्ट देखील पुर्ण होवून हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करता येणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट करत भुसे पुढे म्हणाले, या प्लान्टमुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार असल्याने रुग्णांसाठी सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजनचे हे दोन्ही प्रकल्प दिलासा देणारे ठरणार असल्याचे भुसे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक तसेच हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प साकारत असल्याने शहरातील जनतेसाठी हे प्रकल्प मोठा दिलासा देणारे ठरतील, असा विश्वास आ.मौलाना मुफ्ती यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. करोना महामारीत संभाव्य तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य प्रशासनास भेडसावणार्‍या ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी हा 20-के.एल.क्षमतेचा ऑक्सिजन टँक रुग्णसेवेत मोलाचा ठरेल. या टँकव्दारे 100 बेडसाठी सामान्य रुग्णालयात किमान 15 दिवस (गरजेनुसार) पुरेल इतक्या क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक असल्याने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा तत्काळ उपलब्ध होणे शक्य होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

कार्यक्रमास कृउबा सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, प्रमोद शुक्ला, शिवसेना महानगरप्रमुख राजेश अलीझाड, डॉ. योगेश पाटील, डॉ. संदीप खैरनार आदींसह वैद्यकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या