पुणे | Pune
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली. या समितीचा आता अहवाल समोर आला असून त्यात महत्वाच्या बाबी नमुद करण्यात आल्या आहे.
दरम्यान पुण्यात घडलेल्या या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा होत असून, अनेकांनी या घटनेनंतर रुग्णालयावर टीका केली होती. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्स्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. आता या चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर हा अहवाल समोर आला आहे.
काय म्हंटले आहे चौकशी अहवालात?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने चार मुद्यांवर भर दिला आहे. समितीने म्हटले की, महिला रुग्णासाठी सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसृती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती. अगावू रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, बाळांना दोन-अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरुन दाखल व्हा, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.
या अहवालामध्ये तनिषा भिसे २०२० पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या असे म्हटले आहे. याचबरोबर भिसे यांच्यावर २०२२ साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या ५० टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान या चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.
रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दर सात दिवसांनी यायला सांगितले होते. पण पीडित महिला तपासणीसाठी येत नव्हती.
रुग्णालयाच्या अहवालात म्हटले आहे की, “सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की, आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. पण पीडित महिलेने ही तपासणी केली नाही. १५ मार्च रोजी पीडित महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉक्टर घैसास यांना भेटली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. तसेच त्यांना दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत.”
नेमके घटना काय?
सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना २९ मार्च रोजी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांना रक्तस्त्राव होत होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी भिसे कुटुंबियांकडून २० लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती दिली. दहा लाख रुपये भरले तरच उपचार केला जाईल असे थेट रुग्णालयाकडूनच सांगण्यात आले. ज्यावर कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये भरतो, असे सांगितले. मात्र रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी ते मान्य न केल्याने नाईलाजास्तव भिसे कुटुंबीयांना तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावे लागले. यादरम्यान त्यांचा रक्तस्त्राव वाढला. वाकडच्या रुग्णालयात त्यांनी दोन मुलींना जन्म दिला मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यातल्या रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असे गोरखे यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा