अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
व्यापारी दीपक लालसिंग परदेशी यांचे अपहरण करून खून करण्यासाठी संशयित आरोपींनी वापरलेल्या कारची तोफखाना पोलिसांनी बुधवारी (19 मार्च) फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करून ती जप्त केली आहे. तसेच निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत मृतदेह टाकलेल्या ठिकाणाचीही फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करून नमुने जप्त करण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
10 कोटींसाठी अपहरण करून दीपक परदेशी यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. नगर) व त्याचा साथीदार सागर गिताराम मोरे (वय 28, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यादृष्टीकोनातून पोलिसांकडून तपास केला जात आहे. किरण कोळपे याच्या कारचा वापर परदेशी यांचे अपहरण करण्यासाठी केला होता. ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्या कारची बुधवारी फॉरेन्सिक तपासणी करून ती जप्त केली आहे.
बुधवारी दुपारी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी फॉरेन्सिक टीमसह मृतदेह टाकलेल्या ठिकाणी निंबळक बायपास शिवारात भेट दिली. मृतदेह टाकलेल्या ठिकाणाची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करून तेथील मातीचे नमूने घेण्यात आले. ते नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, तपासाच्या दृष्टीकोनातून संशयित आरोपी सागर मोरे याला बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते.
या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची चौकशी संशयित आरोपींकडे केली जात आहे. तपासाच्यादृष्टीकोनातून फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळ व गुन्ह्यात वापरलेल्या कारची तपासणी करून नमुने घेण्यात आले आहेत.
– आनंद कोकरे, पोलीस निरीक्षक, तोफखाना