मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह (MLA) बंड केल्यानंतर त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyad) मागील काही दिवसांपासून शांत असून आता त्या शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत…
ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी दिपाली सय्यद प्रयत्न करत आहेत. पंरतु ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा प्रवेश झाल्यापासून सय्यद या फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत.
याबाबत बोलतांना सय्यद म्हणाल्या की, ”सुषमाताई नुकत्याच पक्षात आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचे आणि आपले अस्तित्व सिद्ध करायचे आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडे तीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात असे त्यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, प्रत्येकजण आपापली मतं मांडत असून प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल असे सूचक विधान त्यांनी केले आहे. तसेच सध्या मी शिवसेनेत असून ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले होते.