Saturday, July 27, 2024
Homeनाशिकलोकसहभागातून पाटाचे खोलीकरण

लोकसहभागातून पाटाचे खोलीकरण

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेल्या पाटाचे लोकसहभागातून खोलीकरण करण्यास सुरुवात झाल्याने पाटक्षेत्रातील शेतकर्‍यांना त्यातील पाण्याचा फायदा होणार आहे. लवकरच या पाटाच्या पाण्याचा वापर शेतकर्‍यांना करता येणार असून शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

यंदा ठाणगाव परिसरामध्ये पाऊस कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानी चांगला पाऊस झाल्याने नदी उशिराने का होईना प्रवाहित झाली आहे. यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यामुळे शेतकर्‍यांना पुढील वर्ष कसे जाणार अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे रताळवाडी भागातून जाणार्‍या जुन्या पाटाच्या खोलीकरणाचे काम शेतकर्‍यांनी हाती घेतले आहे.

नुकतेच लोकसहभागातून या गावपाटाच्या खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतीला आवश्यक पाणी देण्यासाठी या पाटाचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या पाटात गाळ, माती साचल्याने पाटाचे पाणी प्रवाहित होत नव्हते. त्यामुळे पाटक्षेत्रातील शेतकर्‍यांना त्याचा कुठलाही फायदा होत नव्हता. त्यासाठी सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच विलास मोरे यांच्यासह काही ग्रामस्थांनी लोकसहभागातून या पाटाचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या शिवारात पाटाचे पाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.

यासाठी गावात लोकवर्गणी जमा करून या कामाला गती देण्यात आली आहे. तीन दिवसांत पाडळी शिवारापर्यंत या पाटाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणगावसह पाडळीतील शेतकर्‍यांनाही त्याचा फायदा होणार आहे. पाटाचे खोलीकरण अंतिम टप्प्यात आले असून लगेचच त्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शिंदे यांनी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विहिरींची पातळी वाढणार

यंदा ठाणगावसह परिसरात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने अद्याप येथील शेतकर्‍यांच्या विहिरींना पाणी उतरलेले नाही. आधीच विहिरींची पाणीपातळी खालावली असल्याने पिकांना पाणी देण्यास पाणी शिल्लक नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र आता पाटाच्या खोलीकरणामुळे पाटाला पाणी येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाटातून पाणी प्रवाहित झाल्यास ठाणगावसह पाडळीच्या पाटक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या