Saturday, May 25, 2024
Homeनगरमृतदेहाची विटंबना, गोपाळपूरचे शेरे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मृतदेहाची विटंबना, गोपाळपूरचे शेरे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथील दलित दफनभूमीत मृत व्यक्तींच्या देहाची विटंबना व उत्खनन केल्याच्या निषेधार्थ वारंवार पत्र व्यवहार करून देखील कारवाई झाली नसल्यामुळे श्रीधर रायभान शेरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेरे यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

शेरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गोपाळपूर येथील दफनभूमीत श्रीधर शेरे यांचे वडिल रायभान शेरे यांचे दफन करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची आठवण म्हणून छोटे थडगे बांधलेले होते. सदर दफनभूमीमध्ये सरपंच पद्मा विलास ढोकणे, उपसरपंच सोपान राजाराम घुले व ग्रामपंचायतीचा ठेकेदार सरपंच यांचा पुतण्या किरण शेषराव ढोकणे यांनी संगनमताने सदर दफनभूमीमध्ये जेसीबी मशिनच्या साह्याने उत्खनन केले.

या उत्खनन वेळी त्यांनी दलित समाजाच्या पूर्वजांचे हाडांचे सांगाडे बाहेर काढून देहाची विटंबना केली. यात रायभान शेरे यांचे थडगे वरील इसमांनी संगनमताने उकरून काढले. सदर बेकायदेशीर उत्खननाबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई शासनाकडून झालेली नाही. सदर घटना ही अत्यंत निंदनीय व गंभीर स्वरूपाची असताना देखील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. उलट दलितांवर झालेला अन्याय दडपून टाकण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वतःचा अधिकार कक्षेच्या बाहेर जात पदाधिकार्‍यांना वाचवण्यासाठी खोट्या स्वरूपाची तक्रार दाखल करून शासनाची व दलित समाजाची फसवणूक केलेली आहे. घटनेची चौकशी होऊन संबंधित सर्व व्यक्ती विरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, श्रीधर शेरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या