Friday, May 3, 2024
Homeनाशिककरोना चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई

करोना चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई

इंदिरानगर । वार्ताहर

वडाळा येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात केलेल्या करोना चाचणीचे अहवाल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतून प्राप्त होण्यास दिरंगाई होत आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास दिरंगाई होत असल्याने याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती घेतली असता 6 मार्चपर्यंत येथे जमा केलेले स्वॅब चाचणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. मात्र 4 मार्चला तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचेदेखील अहवाल मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान, 7 मार्चपासून येथील नमुने नाशिक जिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात येत असून ते तातडीने मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यापूर्वी चाचणी केलेल्यांना अहवाल न मिळाल्याने ही सर्व मंडळी धास्तावलेली आहेत.

जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत संपूर्ण कुटुंब काळजीत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तर अनेक जण अहवाल येण्यापूर्वीच थोडे बरे वाटू लागल्याने सर्वत्र फिरत असण्याचीदेखील शक्यता असल्याने त्यातील कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर करोना प्रसार होण्याचीदेखील शक्यता आहे.

मला दोन-तीन दिवसापासून सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने 1 मार्च रोजी मी वडाळागाव प्राथमिक आरोग्य केंदात जाऊन करोना चाचणी केली. परंतु त्याचा अहवाल पाच दिवसांनी मिळेल असे मला सांगण्यात आले. अधिक त्रास जाणवू लागल्याने शेवटी खासगी लॅबमध्ये चाचणी करावी लागली.

प्रसाद कुलकर्णी, नागरिक

याबाबतची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांना देण्यात आली असून ते स्वतः शहानिशा करत आहेत.

संगीता सातपुते, समन्वयिका, वडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र

- Advertisment -

ताज्या बातम्या