नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मोठी दंगल उसळली होती. त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्लीत प्रचंड जाळपोळ, लुटमार झाली होती. १९८४ मध्ये झालेल्या या प्रकरणात काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे नाव समोर आले होते. त्याचप्रकरणी तब्बल ४१ वर्षांनंतर म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये निकाल लागला असून काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १२ फेब्रुवारीला हा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आज त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
१९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत सरस्वती विहार येथेही हिंसाचार झाला होता. हे प्रकरण अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याने दोषी सज्जनकुमार यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी दिली. हे प्रकरण म्हणजे एका विशिष्ट समुदायाच्या सामूहिक नरसंहाराचे प्रकरण असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने सज्जन कुमार यांना १२ फेब्रुवारीला दोषी ठरवले होते आणि आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नेमके प्रकरण काय आहे
नोव्हेंबर १९८४ साली दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरूणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सज्जन कुमार हे एका जमावाचे नेतृत्त्व करत होते. सज्जन कुमार यांनी भडकवल्यामुळे जमावाने जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरूणदीप सिंग यांना जिवंत जाळण्यात आले. यानंतर जमावाने जसवंत सिंग यांच्या घरात लुटमार केली आणि कुटुंबीयांना जखमी केले. याप्रकरणी पंजाबी बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परंतु, नंतर विशेष तपास पथकाने हे प्रकरण आपल्या हाती घेतले. १६ डिसेंबर २०२१ मध्ये न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरोधात आरोप निश्चिती केली होती. परंतु, या प्रकरणात सज्जन कुमार हे २०१८ पासून तुरुंगात होते. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला व सज्जन कुमार यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार आरोप निश्चित केले होते.
फिर्यादीनुसार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्राणघातक शस्त्रे घेऊन आलेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि शीख धर्मीयांशी संबंधित असलेल्या मालमत्तेची नासधूस केली होती.दरम्यान, सज्जन कुमार यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आधीपासूनच सज्जन कुमार हे शीख विरोधी दंगलीशी निगडीत प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा