दुबई । वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्स विरुध्द किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने बाजी मारली.
दिल्लीने कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलादाजीचा निर्णय घेतला आणि पंजाबला १६५ धावांचे आव्हान दिले.
दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ एका चौकारासह ७ धावा काढून तो बाद झाला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दोघांनाही चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. दोघेही वैयक्तिक १४ धावांवर माघारी परतले.
मार्कस स्टॉयनीस ९ धावांवर तर शिमरॉन हेटमायरदेखील १० धावांवर बाद झाला. पण शिखर धवनने एक बाजू लावून धरली आणि अप्रतिम शतक लगावले. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
१६५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी घोडदौड पंजाबच्या संघाने अखेर रोखली. लोकेश राहुल ५ धावांवर तर मयंक अग्रवाल १५ धावांवर माघारी परतला. पण ख्रिस गेलने तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर चोप देत संघाला गती मिळवून दिली. तो २९ धावांवर माघारी परतल्यानंतर निकोलस पूरनने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळली.
पूरनने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २८ चेंडूत ५३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने त्याला उत्तम साथ देत ३२ धावांची खेळी केली. त्यानंतर जिमी निशम आणि दीपक हुडा जोडीने संघाला विजय मिळवून दिला.
निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने ५ गडी आणि ६ चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघाने ८ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली.