नाशिक | Nashik
इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथील शाहीर उत्तम गायकर यांनी इच्छामरणासाठी परवानगी मिळावी, यासाठी विभागीय महसूल आयुक्तांकडे अर्ज केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, उरूस, जयंती, महोत्सव, लग्न वाढदिवस, समारंभ, सोहळ्यांच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे कामाचे पैसै मिळणे बंद झाले आहोत. विविध कार्यक्रम सुरू व्हायच्या आतच करोनाच्या वैश्विक महामारीत कलावंतांच्या संसाराची धुळधाण झाली आहे.
करोनाने मरण्याऐवजी कलावंताला उपासमारीने मरण्याची भिती निर्माण झाली आहे. ‘स्टेजवरचा बादशाह आज भिकेला लागला आहे’. ज्याने आयुष्यभर दुस-याच्या चेहऱ्यावरचं अश्रु घालवुन हसु फुलवले, तोच कलावंत आज मरणासन्न अवस्थेत भिकाऱ्याच जीणं जगताे आहे.
मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, आजारपण उपजीविकेसाठी लागणारी साधनसामग्री यासाठी सरकारकडे अनेक कलावंतांनी साकडे घातले. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाले. या बत्तर जिण्यापेक्षा मेलेले काय वाईट? याकरिता कलावंतांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे शाहीर उत्तम गायकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत लोकसंस्कृती जोपासण्याचे मौलिक व समाजप्रबोधानाचे काम कलावंत आणि शाहीरांनी केले आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून ‘लोकरंजनातून लोकशिक्षण’ देण्याचं कार्य कलावंतांनी केलेले असतांना उपेक्षित कलावंताला दुसरा मार्ग शिल्लक नसल्याने इच्छा मरणास परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
या आहेत मागण्या
*इच्छा मरणाला परवानगी द्यावी किंवा प्रत्त्येक कलावंताला नुकसान भरपाई म्हणूण १लाख रुपये मदत द्यावी.
*कलावंताला मोफत हक्काचे घर द्यावं.
*मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा.
*आजारपणातील औषध उपचार मोफत मिळावा.
*कलावंत पेंशन वयाच्या ४० वर्षांपासून सुरू करावी.
*कलावंताला किमान १० हजार पेन्शन द्यावी.
*रेल्वे व बस प्रवास मोफत मिळावा.
*कलावंत पुरस्कृत विधानपरिषदेवर किमान २ सदस्यांची निवड करावी.
*करोना बाधित कलावंत व परिवारास सरकारी व खाजगी इस्पितळात आरक्षित खाटा उपलब्ध करुन द्याव्यात.