Sunday, November 24, 2024
HomeनाशिकBlog : देवदूत : आमचे सगळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय विभाग

Blog : देवदूत : आमचे सगळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय विभाग

संपूर्ण जग सध्या विचित्र अशा संकटाचा सामना करतंय. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सर्वत्र आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी पडलेली दिसतेय. कुणा अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून सुद्धा सर्वसामान्य माणूस चार हात अंतर ठेवून राहतोय.
पण अशाही परिस्थितीत काही लोक मात्र देवदूता प्रमाणे अहोरात्र झटत आहेत, केवळ त्यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय. अशा या सेवादूतांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

सगळं काही बंद आहे. खूप दिवसांनी जरा निवांत वेळ मिळाला म्हणून म्हंटलं जरा सगळ्या जुन्या मैत्रिणींना फोन करूया. मग काय सुरू झाले, मेरा मोबाईल और मै ।

- Advertisement -

सध्या हा मित्र सोबत असला की फारशी कुणाची गरज पडत नाही. पण तरीही सगळ्या मैत्रिणींना फोन लावत सुटले. छान गप्पा झाल्या , सगळ्या बोअर होत होत्या घरी बसून बसून माझ्यासारख्या त्यामुळे छान गप्पाष्टक रंगलं पण तिने मात्र दिवस भर फोन उचललाच नाही. अस्सा राग आला. 2 -4 वेळा कॉल करून नाद सोडला.

पण रात्री खूप उशिरा तिचा मेसेज पाहिला, ” अग तुम्ही सगळ्या मैत्रिणी कॉल करत होत्या, पण सॉरी, अग कोरोना वॉर्डला ड्युटी आहे माझी सध्या. खूप काळजी घ्यावी लागते ग. अजिबात दुर्लक्ष करता येत नाही पेशंटकडे.” एकदम माझी tube पेटली, अरे ती स्टाफ नर्स आहे ना सिव्हिलला ! तिला कसली सुट्टी नि बिट्टी ? माझ्याच विचारांची मला खूप खूप लाज वाटली .

खरंच या कोरोनाच्या संकटकाळी आपल्या सेवेसाठी तत्पर असणारा हा सगळा मेडिकल स्टाफ म्हणजे आपल्यासाठी कोणत्याही देवदूतापेक्षा कमी नाही. या अचानक उदभवलेल्या संकटाने सगळ्या व्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय, त्यातला सर्वात जास्त ताण सहन करणारी व्यवस्था म्हणजे आपला वैद्यकीय विभाग. देशातच नाही तर सगळ्या जगात हे आरोग्य दूत आपल्या प्राणांची बाजी लावून लोकांचे प्राण अक्षरशः खेचून आणत आहेत. या जीवघेण्या आजारात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही केवळ या आपल्या आरोग्य मित्रांचीच किमया आहे. त्यांची लढाई तरी कुणाशी आहे ? अशा एका अज्ञात शत्रूशी, जो दिसत तर नाहीच पण ज्याच्याविरुद्ध लढण्यासाठी अजून कोणतेही शस्त्र त्यांच्या हातात नाही.

तरीही न हरता, न घाबरता ते लढा देतच आहेत. विचार करा कोरोनाच्या भीतीने आपल्या सामान्य माणसांना बाहेर पडायची देखील भीती आहे परंतु हे देवदूत मात्र चोवीस तास त्या रुग्णाच्या सहवासात असतात, त्यांची सेवा करतात. खरच त्यांच्या साहसाला कडक सलाम ठोकावा वाटतो. त्यांच्याही जीवाची भीती आहेच की. काल परवाचीच बातमी होती, कोरोनामुळे एका लेडी डॉक्टर चा मृत्यू झाला. का ? ती पण ड्युटी नाकारू शकत होती, पण तिला जाणीव असेल आपल्या देशावर आलेलं हे संकट खूप मोठं आहे.

आज आपली जास्त गरज आपल्या देशाला आहे. या त्यागाला त्रिवार वंदन करावेसे वाटते .
या वैदयकीय सेवेत येणारे सर्वच अगदी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, आया, दवाखान्यातल्या मावशी, तंत्रज्ञ, मेडिकल स्टोरचे चालक आणि या रोगावर औषध शोधण्यासाठी धडपडणारे शास्त्रज्ञ इथपर्यंत प्रत्येक जण सेवाभावी वृत्तीने कार्य करतोय.

आपलं घरदार, कुटुंब, जेवणखाण विसरून अहोरात्र झटतोय. मानवतेसाठी, माणसाच्या भल्यासाठी. आजही अनेक दवाखान्यामध्ये असलेल्या कोरोना रुग्णासाठी ते ईश्वराचाच अवतार आहे. आणि आपलं दुर्दैव म्हणजे, आपल्यातीलच काही जण त्यांच्याशी गैरवर्तन करतात. सांगितलेले नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढतोय.

वैद्यकीय व्यवस्थेवरचा ताण वाढतोय. मला तर वाटतं या आजाराच्या रुग्णांपेक्षा संशयित रुग्णाची संख्या भली मोठी आहे. या सगळ्यांना quarantine करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा एक मोठाच ताण डॉक्टरांवर आहे. ज्या आजारापुढे भल्या भल्या देशांनी हात टेकले तिथे सर्वात प्रचंड लोकसंख्या असलेला आपला देश यशस्वीपणे झुंज देतोय, एवढंच नाही तर इतर देशांना मदतही करतोय. हे खूपच अभिमानास्पद आहे.

पण या आरोग्यदूतांचा हा लढा यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला आणि मला पुढचे काही दिवस तरी संयम पाळावाच लागेल आपल्या चुकीमुळे तरी आपण त्यांच्यावरचा ताण वाढवायचा नाही हे मी मनात पक्क केलंय. आज डॉक्टर व नर्सेसला या रोगाची लागण झाल्यामुळे हे हॉस्पिटल्स बंद ठेवावे लागलेत हे खूपच धोकादायक आहे.

विचार करा असे मोठ्या प्रमाणात झाले तर देवही आपल्याला वाचवू शकणार नाही. हा धोका टाळायचा असेल तर एकच उपाय, काळजी घ्या, घरीच रहा, नियम पाळा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा. शक्य असेल तेवढी मदत करा.

मी ही मनोमन त्या मैत्रिणीला आणि सर्व वैदयकीय व्यवस्थेला नमस्कार केला, तुमच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत. या जगातले आजच्या घडीचे खरे देवदूत तुम्हीच आहात .
परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देवो !
सलाम तुमच्या त्यागाला !
सलाम तुमच्या सेवेला !

तनुजा सुरेश मुळे-मानकर, नाशिक ( लेखिका ब्लॉगर आहेत)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या