जळगाव । प्रतिनिधी jalgaon
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या करून दहशत पसरविणारी महिला म्होरकी असलेली टोळी एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे अट्टल गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
टोळीप्रमुख असलेली अयोध्यानगरातील भावना जवाहरलाल लोढा (वय 38) ही साथीदार अनिल रमेश चौधरी (वय 40, रा.अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (वय 26 टोळी सदस्य रा.मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (वय 26 रा.मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (वय 34 रा.तांबापुरा) यांचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे. जामनेर पो.स्टे. भुसावळ बाजारपेठ, पहुर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या करून दहशत निर्माण केली होती. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून देखिल त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर दाखल असलेले आठ गंभीर गुन्हे लक्षात घेता पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार उपविभागीय पोलीस अधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशी अंती महिला टोळी प्रमुख असलेल्या पाचही जणांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
यांनी दिला होता प्रस्ताव
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, स.फौ.अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, चापोना इम्तियाज खान यांनी हा प्रस्ताव तयार करुन सादर केला होता. प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.