Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्याखोट्या कर्जप्रकरणातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा

खोट्या कर्जप्रकरणातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा

नांदुरी | वार्ताहर Nanduri

खोटी कर्जप्रकणे तयार करून ठेवीदारांना 12 कोटी 85 लक्ष 14 हजार 535 रुपयांचा चुना लावणार्‍या श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन अशोक तुकाराम जाधव, कळवण व सुरगाणा शाखा व्यवस्थापकांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण शहरातील श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेच्या कळवण, कनाशी, सुरगाणा अशा अनेक ठिकाणी शाखा आहेत. या पैकी कळवण व सुरगाणा शाखेत बोगस व खोटी कर्ज प्रकरणे करून काही कर्जप्रकरणाच्या व्याजात सूट देऊन अपहार करण्यात आला असल्याचे लेख परीक्षणांत निदर्शनात आल्याचे समजते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तसेच पतसंस्थेतील बनावट कर्जप्रकरणे तयार करून चुकीच्या नोंदी घेऊन बनावट आर्थिक पत्रके तयार करीत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा स्वतःच्या फायद्याकरिता ठेवीदारांची 12 कोटी 85 लाख 14 हजार 535 रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999चे कलम 3 प्रमाणे सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था वर्ग 2 अधिकारी सूर्यकांत तुकाराम गांगुर्डे यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन अशोक तुकाराम जाधव, कळवण शाखा व्यवस्थापक नरेश दत्तात्रेय अहिरे व सुरगाणा शाखा व्यवस्थापक भास्कर दत्तात्रेय बत्तासे यांचे विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भादवी कलम 406, 409, 120-ब, 420, 465, 471, 472,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या अपहार प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.

लेखापरीक्षणात नोंदविलेली अपहार निरीक्षणे –

1) दि 1 एप्रिल 2019 ते दि 2 डिसेंबर 2019 या कालावधीत बोगस व खोटी प्रकरणे तयार करून 1 कोटी 3लाख 72 हजार दर्शविण्यात आलेली कर्ज वाटप रक्कम , 2) रोज कीर्दमध्ये दि 11 एप्रिल 2019 रोजी राजेंद्र भास्कर बत्तासे यांचे नावाने 11 लाख 63 हजार रुपये हायपोथिकेशन कर्ज प्रकरण, 3) 31 मार्च 2019 अखेर प्रत्येक्षात न मिळालेले व्याज उत्पन्नात 11 कोटी 57 लाख 7 हजार 775 रुपये घेऊन बनावट आर्थिक पत्रके तयारकरणे , 4) सुरगाणा शाखेत 12 लाख 71 हजार 760 रुपये व्याजात सूट देऊन केलेला अपहार असे एकूण 12 कोटी 85 लाख 14 हजार 535 रुपयांचा अपहार .

बाजार पट्टीत हातविक्री करून उपजीविका भागविणारे, मजूर , शेतकरी सह अनेक नागरिक पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवतात. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन संधी साधू संस्थाचालक खोटी प्रकरणे तयार करून ठेवीदारांची फसवणूक करीत असतात, अशी चर्चा परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या