Friday, November 15, 2024
Homeनगरआमदार फुटीच्या धक्क्यामुळे ठाकरेंकडून चुकीचे आरोप

आमदार फुटीच्या धक्क्यामुळे ठाकरेंकडून चुकीचे आरोप

लाडकी बहिण’ योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार - उपसभापती गोर्‍हे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उध्दव ठाकरे यांचा आमदारांशी संवाद राहिला नव्हता म्हणून आमदार फुटले. मात्र 10 ते 12 आमदार फुटतील, असे त्यांना वाटत असताना एकाच वेळी 40 आमदार त्यांच्यापासून बाजूला गेल्याने त्यांना धक्का बसला. ते त्या धक्क्यातून अजूनही सावरलेले दिसत नाही. म्हणून ते चुकीचे आरोप करीत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली.

- Advertisement -

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यासाठी काल, गुरूवारी गोर्‍हे नगरला आल्या होत्या. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, बदलापूरच्या घटनेकडे सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता एकत्रिपणे काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पिडितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न होत असतांना त्याबाबत चुकीचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता विरोधकांनी थांबविले पाहिजे. अशा घटना आज नाही तर यापूर्वी देखील घडल्या आहेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतांनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे याकडे राजकारण म्हणून न पाहता या अपप्रवृत्ती आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न झाले पाहिजेत.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येत आहे. राजकीय मतभेदामुळे महिलांना चुकीची माहिती दिली जात आहे. मात्र सरकारने लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही योजना आणली असल्याचाही आरोप केला जात आहे. मात्र यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत अशा अनेक योजना आणल्या. त्यामुळे निवडणूक आल्याने ही योजना आणल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे त्या म्हणाल्या. शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी माझ्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रपती यांच्यासोबत देखील यावर बोलणे झाले असून शक्ती कायद्यावर लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असेही गोर्‍हे म्हणाल्या.

कायदा-सुव्यवस्थेचा आढावा
नगर जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा आढावा उपसभापती गोर्‍हे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून घेतला. भरोसा सेल प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारणे शक्य नसल्याने महिन्यातून एक दिवस प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून महिलांच्या ऑनलाइन तक्रारी नोंदून घ्याव्यात, जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाण्यात जागा उपलब्ध आहे तेथे बालस्नेह पोलीस कक्ष सुरू करावे. जेणे करून लहान मुलांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर दबाव येतो. त्यांना बोलता येत नाही. अशावेळी शाळेचे वातावरण असलेल्या बालस्नेह पोलीस कक्षात मुलांना कोणाच्या दबावाशिवाय मनमोकळे बोलता येईल. तक्रार करता येईल अशी व्यवस्था करावी. तसेच नवीन कायद्याची माहिती सर्वांना मिळावी या दृष्टीने प्रचार व जनजागृती करण्याच्या सुचना अधीक्षक ओला यांना केल्या असल्याचे उपसभापती गोर्‍हे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या