धुळे – Dhule – प्रतिनिधी :
यंदाच्या होळी उत्सवावर करोनाचे सावट असले तरी घरीबसून रंगांची नव्हे तर वेगवेगळ्या कलेची उधळण करणारा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमातून कलेची बरसात होणार आहे.
दै.देशदूत आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पध्दतीने हा कार्यक्रम होणार आहे.
यात डॉ.रमेश जैन यांचे बहारदार काव्य, डॉ.अभिनय दरवडे यांचे ताज्या घटनांवरील एकपात्री, सुभाष शिंदे यांचा अहिराणी ठसका, मतीन जैन यांचे काव्य तसेच केदार नाईक यांच्या एकपात्रीसह नक्कल, राजेश खलाणे यांचे विडंबन, दिया भालेराव यांचे लालित्यपूर्ण काव्य तर पुर्वेश चौधरी यांनी सादर केलेले सुमधूर बासरीवादन अशा विविध कलाप्रकारांचा आस्वाद घेता येणार आहे.
करोनामुळे सार्वजनिक सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याच अनुशंगाने दै.देशदूत आणि रोटरी संयुक्तपणे हा अनोखा उपक्रम सादर करीत आहे.
आपापल्या घरी, आपण असाल त्या ठिकाणाहून ऑनलाईन पध्दतीने आपल्याला या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. याचा जास्तीत जास्त दर्शकांनी लाभ घेण्याचे आवाहन संपादक हेमंत अलोने, अनिल चव्हाण, रोटरीक्लबचे महेश शिंदे, सेक्रेटरी अमित ठक्कर यांनी केले आहे.