महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात गड-किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच गड-किल्ल्यांच्या समृद्धीने परिपूर्ण अशा सह्याद्री पर्वतरांगा म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच म्हणता येईल. स्वराज्य स्थापनेपासून, तर जागतिक पातळीवर समृद्ध राज्य म्हणून नावलौकिकास पात्र असलेल्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या या समृद्धीचा हा थोडक्यात आढावा…
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी शत्रुशी केलेला सामना व मिळवलेला विजय म्हणजे साक्षात सह्याद्री पर्वतावरील त्यांंच्या पराक्रमाची गाथा होय. मातोश्री जिजाऊंनी जाणिवपूर्वक घडवलेले शिवाजी महाराज प्रजेचे रक्षणकर्ता होते. त्यांनी जिवावर उदार होऊन घनदाट जंगल व डोंगर-दर्यांतून सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोनशेहून अधिक भक्कम किल्ले बांधले. मराठी अस्मिता नि शौर्य यांची साक्ष म्हणजे गौरवशाली सह्याद्री. सह्याद्रीच्या डोंगर-दर्यांतून ते रात्रंदिवस हिंडले. त्यामुळेच शिवाजी महाराज व सह्याद्री हे परस्परांना पूरक होते.
विविध गडकिल्ले निसर्ग सौंदर्याने नटलेला ‘घनगड’किल्ला हा आजही सह्याद्रीतील कठीण व मजबूत किल्ल्यांची साक्ष देतो. रायरेश्वर पठाराजवळील ‘केंजळगड’ किल्ला व परिसर सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा साक्षात्कार देतो. पुण्याजवळील राजगड किल्ला हा सर्वात मोठा आहे.
कवयित्री शांता शेळके यांच्या लेखणीतून उतरलेले ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हे सर्वार्थाने परिपूर्ण गीत आहे. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हेमंत कुमार व मीना खडीकर या सर्वांनी हे गीत जोशात गाऊन सह्याद्रीचे व शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गौरवगान मोठ्या कौतुकाने सर्वांपुढे ठेवले आहे. त्यातील काही ओळी
‘शुभ घडीला शुभ मुहूर्ती, सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी, घुमत वाणी
जयजयकारे दुमवू हे
सह्याद्रीचे कडे, सह्याद्रीचे कडे’
कवयित्री शांता शेळके यांच्या देशभक्तीपूर्ण शब्दांनी मराठ्यांचा इतिहास जाज्ज्वल्य करत जय भवानीच्या गजराने सह्याद्रीचे कडे अजरामर झाले आहेत.
संपूर्ण परिसराला वरदान
सह्याद्रीला पौरुषाचा मूर्तीमंत साक्षात्कारही म्हणतात. कारण सह्याद्री हा प्रत्यक्ष ज्वालामुखीचा उद्रेक आहे. बारमाही वाहणार्या नद्यांनी पूर्ण परिसराला धनधान्य व फळा-फुलांनी समृद्ध केले आहे. येथील घनदाट अरण्यात वाघ, सिंहासारखे अनेक पशु आणि किलबिलणारे अनेक पक्षीही आहेत. त्यांच्या वावरण्याने सह्याद्री कायम गजबजला आहे. सह्याद्री डोंगर रांगांवर अनेकप्रकारची झाडे आहेत. त्यात जसे असंख्य फळझाडं आहेत, तद्वतच आयुर्वेदीक औषधीयुक्त झाडेही आहेत. त्यामुळेच सह्याद्री पर्वत सर्वार्थाने सर्व परिसराला वरदान आहे व पित्याप्रमाणे सर्वांचा रक्षणकर्ताही आहे. भारताच्या पश्चिमेला असलेल्या सह्याद्रीवर साहजिकच पश्चिम महाराष्ट्राचे अपरंपार प्रेम आहे. सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग आहेत.
सह्याद्री पर्वत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू अशा ६ राज्यांमध्ये दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या डोंगर रांगांचे क्षेत्रफळ ६० हजार चौरस कि. मी. आहे. पूर्वी या भागात वन्य जिवांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यामुळे सरकारने कोयना व चांदोली ही दोन क्षेत्रे वन्य जीवांसाठी संरक्षित केली आहेत.
विपुल वनसंपत्ती
सह्याद्री पर्वतराजींना नंदनवन परिसर म्हणणे संयुक्तिक होईल. सह्याद्रीच्या पठारांवरही विपुल पुष्प संपन्नता व विविधता दिसून येते. सातारा जिल्ह्यातील कास पठार रंगीबेरंगी फुलांनी अक्षरश: बहरुन येते. साक्षात स्वर्गीय सौंदर्यानुभव मिळविण्यासाठी लाखो पर्यटक येथे पर्यटनास येतात. आता जरा व्यापारीकरणामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. कारण परिसराची पवित्रता जपली जात नाही. गर्दीमुळे लहान फुलझाडांचा नाश होतो. त्यांचे जतन करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
नद्या अन् शिखरांचे सौंदर्य
सह्याद्रीत उगम पावलेल्या नद्या धरतीमातेला सुजलाम सुफलाम करतात. गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या पूर्ववाहिनी नद्या आहेत. गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा, मुळा, कोयना, पंचगंगा या नद्यांचा उगमही सह्याद्रीतूनच होतो नि भोवतालचा परिसर समृद्ध करत त्या सागराला मिळतात. शेतकर्यांनाही या पाण्याचा चांगला उपयोंग होतो.
सह्याद्रीतील शिखर वृक्षवेलींनी परिपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आहे, जे ४ हजार ६४६ मीटर उंच आहे. नाशिकलगतचे साल्हेर-मुल्हेर, सप्तशृंंगी, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, तौला ही पवित्र शिखरं आहेत. तोरणा, रायगड, रायरेश्वर, नाणेघाट, ताम्हणी ही शिखरं पुण्यात आहेत. सातारचे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात स्ट्रॉबेरीचे पीक चांगले येते. अमरावतीचे चिखलदरा व बैखपट साक्षात सौंदर्याचे प्रतीक आहेत. अहमदनगरचा हरिश्चंद्र गड, गडचिरोलीचा गडालगट्ट व नंदूरबारचे अस्तंभा अशी सह्याद्रीतील १९ शिखरं सर्वांनाच परमोच्च आनंद देतात.
कवी गणेश पावले लिहितात.
मरणाची भीती नव्हती. स्वराज्य हाच ध्यास.
तोफांचा आवाज होता. घोड्यांच्या टापांचा नाद.
कडेकपारीत फिरत होता. मर्द मराठ्यांचा वाघ.
अशा अनेक कवितांमध्ये सह्याद्री व महाराष्ट्राचा अभिमान दिसतो.
आदिवासी रक्षणकर्ते
सह्याद्रीच्या पायथ्याशी आदिवासी जमाती राहतात. यात महादेव कोळी, महादेव वारली व भिल्लांचाही समावेश होतो. व समुदायाने राहणारे हे लोक अतिशय काटक व कष्टाळू असतात.
महादेव कोळी सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात मुळशीपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत आणि जव्हार भागातही आढळतात. हे आदिवासी जंगलाचे व जंगलातील प्राण्यांचे रक्षण करतात. पोटासाठी कष्ट करतात. कंदमुळ व रानभाजी त्यांना आवडते. एकवीरा देवीची ते पूजा करतात.
महादेव वारली पेठ, सुरगाणा, जव्हार, हरसूल भागात पाड्यांवर वस्ती करून राहतात. ठाणे, पालघर येथेही दिसतात. यांचे पारंपरिक वारली पेंटींग प्रसिद्ध आहे. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबुंच्या काडीने ते चित्र काढतात. घराच्या भिंतीवर वारली पेटींग काढतांना त्यात लोकजीवन, झाडी, घरं, पक्षी अशा सहजपणे दिसणार्या अनेक गोष्टी काढतात. चित्रकला त्यांच्या रक्तातच आहे. होळी हा त्यांचा मुख्य सण आहे. होळी पेटवल्यावर पूजा होते. माणसं वाद्य वाजवतात. त्या तालावर बायका व पुरुष बराच वेळ तारपा नृत्य करतात. या परिसरात मुबलक प्रमाणात रानभाज्या मिळतात. दिवाळीत ही मंडळी धान्याचे पूजन करतात व नंतर ते धान्य वापरतात. बायका परकर, झंपर व फडकी वापरतात, तर पुरुष धोतर वापरतात.
भिल्ल जमातही या डोंगर दर्यांमध्ये दिसते. ही जमातही कष्टकरी व अंगाने पिळदार, दणकट असते. सह्याद्रीच्या उतारावर नागली चांगली पिकते. त्यामुळे लाल नागलीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा व कांदा हे त्यांचे मुख्य जेवण असते. सर्व आदिवासी डोंगर भागात डोंगरांचे व जंगल संपत्तीचे रक्षण करतात. सह्याद्री पर्वत रागांचे ते जणू रक्षणकर्ते आहेत. आदिवासी व भिल्ल कष्टाळू तर आहेतच; पण स्वाभिमानीही आहेत. भारती बर या आदिवासी मुलीच्या परिचयातून मला या लोकांची संस्कृती चांगल्याप्रकारे ज्ञात आहे. हे लोक अतिशय प्रामाणिक व जीव लावणारे असतात. त्यांची कष्टाळू वृत्ती व समाधानी चेहरा पाहून आदिवासींबद्दल अधिकच माया जागृत होते.
आपली जबाबदारी
आपण सर्व नागरिक मिळून सह्याद्रीचे रक्षण करू या. गडकिल्ले चांगल्या स्थितीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. उंच शिखरं व नद्यांचे पावित्र्य जपून जास्तीत जास्त झाड लावून जंगल संपत्ती वाढवू या. सह्याद्रीचे कडे कायमस्वरुपी गर्वाने उभे राहतील, यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू. गौरवशाली सह्याद्रीच्या अथांग कड्यांना त्रिवार वंदन करू या नि मोठ्या गर्वाने व अभिमानाने त्यांच्याकडे पाहू या. धन्य त्या जिजाऊ माऊली व शिवाजी महाराज! अभेद्य गड किल्ल्याचे निर्माते व शूरवीर लढवय्ये! त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन नमन करू या-
सह्याद्रीचे गौरवशाली कडे
अभिमानाने पाहू त्यांच्याकडे.
सौ. अलका चंद्रकांत दराडे – जेष्ठ साहित्यिका, नाशिक
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा