राकट आणि कणखर अशा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर आजन्म बागडणार्या आदिवासीच्या दैनंदिन जीवनात अनेक रुढी, परंपरा, श्रद्धा यांना खूप महत्त्व आहे. आदिवासी समाज संस्कृतीचा वारसा अनादी काळापासून जतन करीत आलेला आहे. कुलदैवतांची पूजा अथवा डोंगरदेवाच्या पूजा-विधीला आदिवासींच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. डोंगरदेवला ‘भाया’ असेही म्हणतात. डोंगरदेव हा शब्द साधारणतः प्रमाणभाषेच्या जवळचा, तर ‘भाया’ हा शब्द आदिवासी डांगी बोलीतील शब्द आहे. या संपूर्ण विधीविषयी..!
डोंगरदेवाची पूजा म्हणजेच कुलदैवताची पूजा होय. महाराष्ट्रातील विविध भागात आदिवासी कुलदैवताची पूजा केली जाते. ह्या कुलदैवतांच्या पूजा विधीची परंपरा फार जुनी आहे. आजतागायत ती वडिलोपार्जित आदिवासी समाजात चालत आलेली आहे. डोंगरदेवाच्या विधीचे काही प्रदेश नाशिक जिल्ह्यातील साधारणतः जे आदिवासी तालुके आहेत, यात मुख्यतः सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, पालघरमधील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, कासा हे तालुके, नंदुरबार व जळगाव, तसेच गुजरात राज्यात आदिवासी भागातील डोंगरदेवाचा विधी आदिवासी करतात. पूर्वी हा विधी किंवा पूजा साधारणपणे ८ दिवसांचा होत असे. अजूनही काही भागात ८ दिवसांचाच विधी होतो. तर काही भागात तो आता दोन दिवसांचा, तीन किंवा चार दिवसांचा विधी केला जातो. डोंगरदेवाच्या विधिमागील कारणे डोंगरदेवाच्या विधीचे दोन प्रकारे आयोजन केले जाते.
१)सामूहिक रीतीने (गावकर्यांमार्फत), २) वैयक्तिक (एक कुटुंब/दोन कुटुंब) जर गावावर कायमच संकट येत असेल, तर गावाच्या कुलदेवताची पूजा म्हणून डोंगरदेवाची पूजा केली जाते. जर गावात काही अपशकून, अनुचित घटना, शेतीपिकाला संकटे घडून गावाला बाधा होत असतील किंवा अशा काही दुःखद घटना घडत असतील, तर सर्व गाव एकत्र येऊन गांवदेवी येथे एकत्र येत डोंगरदेवाची पूजा किंवा विधीचा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात येते.
गावातील एखाद्याच कुटुंबामध्ये हानी, नुकसान, बाधा होत असेल (उदा. शेतीचे सलग दोन ते तीन वर्ष उत्पन्न कमी होणे, त्या कुटुंबामध्ये माणसे सारखी आजारी पडणे किंवा त्या घरातील जनावरांना रोगराई होणे इ.) अशावेळी डोंगरदेवाचा विधी एखादे कुटुंब किंवा दोन चार भाऊबंदकीचे कुटुंब एकत्र येऊन हा विधी पूर्ण केला जातो.
आपली कुलदेवता आपल्यावर नाराज आहे किंवा आपल्याकडून तिची काही अपेक्षा/मागणी आहे, म्हणून ती आपला अप्रत्यक्षरीत्या छळ करते, त्रास देते, हानी करते, तिची मनधरणी करण्यासाठी हा विधी केला जातो.
गावातील प्रमुख काही व्यक्ती, जाणकार, दुसर्या गावातील भगताकडे तांदळाचे दाणे घेऊन जातात. भगत गावावर आलेल्या संकटाचे विश्लेषण करतो. स्पष्टीकरण होऊन गावाला वचन दिले जाते. डोंगरदेवाच्या विधीचे वचन पूर्ण करावे लागते.
विधीची पूर्वतयारी :
एकदा डोंगरदेवाच्या विधीचा कार्यक्रम करायचे पक्के ठरविल्यानंतर मग मात्र त्याची तयारी १५ ते २० दिवस अगोदरपासून करावी लागते. सुरुवातीला वचनपूर्ती करणारा भगत, पावरकर, ढोलकर, घांगळीवाला (मोठ्या आकाराच्या भोपळ्यापासून बनवलेले एक वाद्य), तांब्यांच्या थाळीवर मांगची काडी उभी करुन कथा सांगणारा थाळकर, अशा महत्त्वाच्या व्यक्तींना १५ दिवस अगोदरच सुपारी म्हणजे त्यांची ठरलेली पैशाच्या स्वरुपातील रक्कम द्यायची असते.
विधीसाठी लागणारे साहित्य-मोराची पिसे, ऊसाचे दोन ओल्या काठ्या, पाच-सहा झेंडू असलेली जीवंत रोपटे, माऊलीच्या मानासाठी कोंबडे, बोकडे, नृत्यासाठी तारपा, घोळकाठी, पायातील घुंगरु, लिझिम, चाबूक, गाईच्या वासराचे तीर्थ आशा अनेक महत्त्वपूर्ण साहित्याची जमवाजमव करावी लागते.
मठाची/रिंगणाची जागा :
डोंगरदेवाच्या विधीतील महत्त्वाचे ठिकाण किंवा जागा म्हणजे रिंगण होय. डोंगरदेवाचा विधी ज्या घरी होणार असतो त्या घराच्या समोरच ह्या मठाची/रिंगणाची जागा निश्चित केली जाते. साधारणतः १५ फुटाचा गोल मठ असतो. बरोबर त्या मठामध्ये मध्यभागी ‘थोंब’उभारला जातो. ऊसाच्या दोन ओल्या कातया, मोराच्या पिसाचे दोन गुच्छ उभे केले जातात. तांदूळ, दिवा, वाळूक (मोठी काकडी), नृत्यासाठी लागणारे सगळे साहित्य तिथे ठेवले जाते. त्याची पूजा केली जाते. ती जागा अगोदर गोमूत्राने शुद्ध केली जाते. (हे गोमूत्र ज्या गाईला पहिलेच वासरु झाले असेल अशा वासराचेच घेतले जाते) या ठिकाणी स्त्रियांना नियम पाळावाच लागतो. मठाच्या बाहेर राहून स्त्रिया दर्शन घेऊ शकतात.
विधीचे स्वरुप :
डोंगरदेवाचा विधी शक्यतो प्रत्येक वर्षात फक्त नोव्हेंबर महिन्यात पौर्णिमेच्या चंद्राला होतो. ह्या विधीची सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर संंध्याकाळी (रात्र सुरु झाल्यानंतर) पूजेला सुरुवात केली जाते. ही पूजा मुख्य भगत करीत असत्तो. डोंगरदेवासाठी लागणार्या सर्व साहित्याची, साधनांची पूजा केली जाते. ज्याला शक्य आहे असे लहान मूलं व पुरुष मंडळी ह्या दिवशी उपवास धरत असतात. मठाच्या रिंगणाभोवती लहान मूलं (कुमार अवस्थेतील) गोल रिंगण करुन बसलेली असतात. ह्यांच्या अंगात देवाचा संचार करायचा असतो, म्हणून त्यांना ‘माऊल्या’ असे म्हणतात. रिंगणाच्या बाहेर गावातील समस्त स्त्रिया आणि गावकरी मंडळी आपापल्या सोयीनुसार जागेवर बसून आनंद घेतात. उत्सुकतेने, कुतुहलाने ह्या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय म्हणून टेंबा किंवा लाईटची सोय केलेली असते.
थाळीवर भांगाच्या काडीला मेण लावून कथा म्हणणारे थाळकर व त्याचा साथीदार सूरया (आवाज सूर मिसळणारा) पूजेला सुरुवात झाल्यापासून कथा म्हणत असतात. ह्या कथेत ते आदिवासीच्या देवदेवतांची नावे गुंफीत ही कथा रंगवत असतात. कुलदेवतांची नावे, माऊलीचे नाव, भवानी आईचे नाव, भूताची नावे, म्हसोबा, खंडोबा, रानवा, नागदेव, पागुळदेव, माजीर देव, भस्यादेव, खैसदेव, अगीनदेव, लाठीदेव, वाघदेव, आकाशदेव, अळवट देव अशी संगळ्याच देवांची नाव घेऊन ही कथा रंगवली जाते. साधारणतः ७०० शेवरी, ९०० कुवरी, १००० कोपावली इतक्या निसर्गातील जंगलातील आदिवासीच्या दैवतांची नावे कथेत गुंफत कथा पुढे रंगवली जाते. कथानिवेदक आवाजावर ताल, सूर, लय आणि थाळीच्या सूरावर विधीला रंग चढत असतो. कथानिवेदक जस जसा कथेत देवांची नावे घेत असतो, तसतसे लहान मुलांसहित पुरुषांच्या अंगात देवाचा संचार होतो. सगळ्या स्तरातील माणसामध्ये विविध देवांचा संचार होतो.
नंतर सूडाचा कार्यक्रम सुरु होतो. सूड म्हणजेच दोन कथेत गॅप किंवा अंतर होय. पहिला सूड हा नेहमी मानाचा असतो, नंतर दुसरा सुड हा माऊलीचा असते. दोन किंवा तीन सूड होतात. ह्या सूडाच्या विधीमध्ये अनेक चित्तथरारक क्षण अनुभवावयास मिळतात. मठाच्या बाहेर कोणीही जात नाही. मठात नाचत असताना प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळ्या देवांचा संचार होतो. जर वाघदेव असेल, तर वाघासारखा चालेल, डरकाळ्या फोडेल, गर्जल. अगीनदेव अंगात संचारला असेल तर त्याला तप्त लाकडाचा कोळसा खाल्याशिवाय समाधान मिळत नाही. भस्म्यादेव आला असेल तर त्याला काट्यावर उभे राहणे, अंगावर घेऊन दाब देणे, काट्यावर नाचणे इ. कृती केल्याशिवाय त्याचा देव शांत होत नाही.
खैसदेव (रंडादेव) अंगात संचारला असेल आणि रात्रीचे १२ किंवा १ वाजले असतील, थंडी असेल तरीही थंडगार पाणी घेऊन त्यात लोळण घेतात. विहिरीत आंघोळ घेतल्याशिवाय राहवत नाही. पांगुळदेव आला असेल तर त्याला इतरांच्या मदतीने फिरवावे लागते. लाठीदेवाचा अंगात संचार झाल्यावर चाबकाने फटके द्यावेच लागतात. आंकाश्या देव अंगात संचारला असेल, तर सबंध सूड थांबेपर्यंत दोन्ही हात वर करुन तो आरोळ्या देत नाचत असतो. असे नाना तर्हेने आदिवासींच्या देवांचा येथे मिलाफ झालेला असतो. थोडक्यात काय, तर ह्या दैवीविधीत/ दैवीउत्सवात गावाबाहेरील जे देव, भूत. रानवा, माऊली असतात, ते ह्या उत्सवामध्ये गावातील माणसाच्या रुपाने हजेरी लावत असतात. माणसाच्या रुपाने नाचण्याचा आनंद, सहभाग याला गोमूत्राने पवित्र केले जाते, मगच प्रवेश दिला जातो. हा सगळ्या देवांचा नृत्य आविष्कार चालू असतो, त्यावेळेस गावातील स्त्रिया ताटात दिवा घेऊन त्यांची ओवाळणी घालतात. त्यांना नमन करतात. आजूबाजूला बसलेले समस्त गावकरी मात्र सून्न होऊन पाहात असतात. कुतुहल, जिज्ञासा, आनंद ह्या भावनेतून आखा जनसमुदाय त्याचे दर्शन घेत असतो.
एक नियम असतो. ज्याच्या घरी डोंगरदेवाचा विधी असतो त्याला पाच घरी तरी गावमागणीचा कार्यक्रम करावाच लागतो. हा गावमागणीचा कार्यक्रम प्रत्यक्ष त्याच गावात व कधी कधी दुसर्या शेजारील गावात जाऊन करावा लागतो. प्रत्येक घराजवळ जाऊन डोंगरदेवाची गाणी म्हणून नाचायचे. तिथे ज्या जिखन्या (पैसे) ठेवलेले असतात ते पैसे पावरकर, घोळकाठीवाला किंवा अन्य अंगात देव संचारलेला व्यक्ती येऊन ते शोधून घ्यावे लागते. कधी कधी दरवाजासमोर ७-८ वस्तू एकत्र करुन त्यामध्ये पैसे, रुपये लपविले जातात. आता वस्तूंऐवजी प्रत्येक दाराजवळ पुस्तके ठेवली जातात. ह्या पुस्तकांमध्ये रुपये लपविले जातात. काही वेळेस घरात पैसे ठेवले जातात. हा सगळा जिखन्याचा कार्यक्रम झाला की घरमालकीण आनंदाने धान्याच्या स्वरुपात भात, तांदूळ, नाचणीचे पीठ देत असते. अशाप्रकारे सबंध गावभर हा उत्सव पार पंडत असतो.
संध्याकाळी गावमागणीचा कार्यक्रम झाल्यावर जेवणाचा कार्यक्रम आटोपून रात्रीच्या डोंगरावरच्या गढाबच्या मुक्कामाची तयारी केली जाते. स्वतःचे अंथरुण, पांघरुण बरोबर घ्यावे लागते. मठातले/रिंगणातले सर्व पूजेचे साहित्य, वाद्य साहित्य, नाचतांना लागणारे साहित्य, कोंबडे, बोकड आदी सर्व सोबत घेतले जातात. गडावर, डोंगरावर फक्त लहान मूल आणि पुरुष मंडळीच असतात. महिला फक्त गावाच्या बाहेर उभ्या राहून देवांची बोळवणी करतात. त्यांना आरतीने ओवाळून निरोप देतात.
डोंगर /गड डोंगर्यादेव माहिती गावालगत असणार्या गडावर, डोंगरावर संध्याकाळी पोचल्यावर तिथं वडीलोपार्जित पूर्वीचेच रिंगण असते. त्यास खळीफ असे म्हणतात. रात्रीचा मुक्काम व सगळा विधी त्या खळीतच केला जातो. अंधार पडल्यावर गवताची पेंढी पेटवून सगळ्या देवांना गडावर येण्याचे आमंत्रण दिले जाते. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. तिथे मात्र माऊलीच्याच कथा सांगितल्या जातात. मावली म्हणजेच कुलदेवता होय. ह्या माऊलीच्या, कुलदैवताची जन्माची कथा लहानपण, लग्न, संसार, मूलबाळे अशातर्हेने कथानिवेदक कुलदैवताचा जीवनपट कथांच्या माध्यमातून उलगडवत असतो. तेथे सुध्दा समुदायाने माऊलीच्या गाण्याअगोदर सर्वजण नाचतात.
ढोलकर, पावरकर, वेगवेगळे सूर काढून सगळ्या संचारीत देवांना व सर्व नाचणार्या मंडळीना मंत्रमुग्ध करतात. रात्री सगळे पुरुष मंडळी शांत झोपी गेलेले असतांना देवाधर्माच्या कथा, सत्यवान सावित्री, त्रिमुखी दत्ताच्या कथा, माऊलीच्या कथा रंगवून जागरण केले जाते. सगळीकडे पहाटे शांत वातावरण असताना थाळकराच्या थाळीचा मंजुळ आवाज व कथा सांगणार्या कथानिवेदकाचा न थकणारा आवाज त्या डोंगराच्या सर्वांत उंच अशा ठिकाणाहून सबंध सृष्टीत नाद घेत असतो. अशा सर्व कथा न थकता, न भागता कुठेही खंड न पडता थेट सकाळच्या सूर्योदयापर्यंत सांगितल्या जातात.
तिसर्या दिवसाचा विधी हा माऊलीच्या कुलदैवताच्या पूजेचा असतो. माऊलीच्या घरात (गुहा, डोंगरातील भुयार) प्रत्यक्ष जाऊन हा पूजेचा विधी पूर्ण केला जातो. कुलदेवताला कोंबडा आणि बोकडाचा मान दिला जातो. त्या भुयारातली/ गुहेतली माऊलीची/कुलदेवताची भगत, घरमालक, गावातील मंडळी पूजा करतात व शेवटी त्या
देविदास कामडी– लेखक
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा