पश्चिम घाट… एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ… हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या पर्वतरांगांपैकी एक आहे. डेक्कन पठाराच्या पश्चिम किनार्यावर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या सहा राज्यांतून उत्तर ते दक्षिण धावणारे हे पर्वत डेक्कन बेसॉल्ट आणि Precambrian Peninsular Shield ला छेदतात. ताप्ती नदीच्या दक्षिणेकडील सातपुडा पर्वतरांगेपासून उत्तर दिशेला सुरू होणारा पश्चिम घाट भारतीय द्विपकल्पाच्या दक्षिण टोकापर्यंत, सुमारे १,६०० कि.मी. (९९० मैल) पसरलेला आहे. हा घाट कन्याकुमारी जिल्ह्यातील Swamithope येथील Marunthuvazh Malai येथे संपतो. पश्चिम घाटातील नदीदृश्ये केवळ रमणीयच नाहीत तर अत्यंत गतिशीलदेखील आहेत, ज्यांचे स्वरूप विविध भूआकृतीक (geomor phological) प्रक्रियांनी घडवलेले आहे. येथून उगम पावणार्या नद्या द्विपकल्पीय भारतातील लाखो लोकांचे जीवन आधारस्तंभ आहेत, ज्या पर्यावरणीय प्रणाली आणि मानवी क्रियांवर प्रभाव टाकतात. या नदीदृश्यांचे भूआकृतीक स्वरूप भूगर्भीय हालचाली, बदलते पावसाचे स्वरूप आणि लाखो वर्षांपासून भू-क्षरण/ धूप (erosion) प्रक्रियेद्वारे आकारले गेले आहे.
पश्चिम घाट हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय प्रदेश आहे; परंतु त्याचे भूआकृतीक स्वरूप प्राचीन भूगर्भीय प्रक्रियांमुळे प्रभावित झाले आहे. गोंडवाना भूखंडाच्या तुकड्यातून तयार झालेल्या या पर्वतरांगेने नद्यांच्या प्रवाहावर प्रभाव टाकला आहे. जरी उचलण्याचे दर धीमे असले तरी त्यांनी नद्यांच्या प्रवाहाची उतार आणि दिशा प्रभावित केली आहे, ज्यामुळे नदीदृश्यांचे एकूण भूआकृतीक स्वरूप घडले आहे.
पश्चिम घाटातील नद्या उंच पर्वतांमधून उतरताना तीव्र उतार असतात. या प्रदेशात धबधबे आणि वेगवान प्रवाह निर्माण होतात. उदाहरणार्थ, शरावती नदीवरील जोग जलप्रपात आणि मांडवी नदीवरील दूधसागर जलप्रपात हे पश्चिम घाटातील भूआकृतीक प्रक्रियेचे परिणाम आहेत.
पश्चिम घाटांची भूवैज्ञानिक उत्क्रांती
पश्चिम घाटातील पर्वतश्रेणीला तीन संरचनात्मक विभागांमध्ये विभागले आहे : महाराष्ट्रातील डेक्कन ट्रॅप्स, कर्नाटकमधील धारवाड क्रॅटन आणि केरळमधील दक्षिणी ग्रॅन्युलाईट भूभाग. पश्चिम घाटांचा पश्चिमेकडील उतार उंच आहे. त्यात अनेक खडकाळ उतार आढळतात. या पायर्यांसारख्या उतारांना ‘पश्चिम घाट’ असे म्हणतात. या पर्वतरांगेला सह्याद्री म्हणतात आणि पश्चिम घाट हे त्याचे एक उभे उतार आहेत. पश्चिम घाट विविध प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे. या खडकांमध्ये उत्तरेकडील डेक्कन बेसॉल्ट, मध्यभागी प्रीकॅम्ब्रियन मिग्मटाईट नाईस आणि धारवाडमधील ज्वालामुखी-आवर्तनीय अनुक्रम आणि दक्षिणेकडील उच्चस्तरीय ग्रॅन्युलाईट नाईस समाविष्ट आहेत.
पश्चिम घाट भारतातील प्रमुख जलसंधारण क्षेत्रांपैकी एक आहे, जे अनेक कायमस्वरुपी नदीप्रणालींना पोषक आहे. भारताच्या सुमारे ४० टक्के भूमी क्षेत्रावर पसरतात. पश्चिमेला डेक्कन पठाराच्या जास्त उंचीमुळे बहुतेक नद्या पूर्व दिशेने बंगालच्या उपसागराकडे वाहतात. ज्यामुळे पूर्वेकडील उतार तासलेले आणि पश्चिमेकडील अरबी समुद्राला सामोरे जाणारे अधिक उंच आहेत. पश्चिम घाट भारतातील हवामान आणि ऋतू ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अरबी समुद्रातून पूर्वेकडे वाहणार्या पावसाळी वार्यांना हे घाट अडवतात. ज्यामुळे पश्चिम किनार्यावर पाऊस पडतो. जेव्हा हवा पर्वतांवरून वर जाते तेव्हा ती कोरडी होते आणि डेक्कन पठाराच्या आतील भागाकडे असलेल्या बाजूवर खूप कमी पाऊस असलेला सावली प्रदेश निर्माण करते.
जलप्रणाली (Drainage System)
पश्चिम घाट अनेक पश्चिमवाहिनी आणि पूर्ववाहिनी नद्यांचा उगम करतो. या नद्यांची जलप्रणाली प्रामुख्याने शृंखलाबद्ध (dendritic) आहे, म्हणजेच ती शाखीत स्वरुपाची आहे; परंतु काही ठिकाणी समांतर जलप्रणालीदेखील आढळतात. या जलप्रणालींचे स्वरूप भूमीचा उतार, खडकांची रचना आणि हवामानाच्या घटकांवर अवलंबून असते.
दक्षिण-पश्चिम मान्सूनमधून होणारा मोठ्या प्रमाणात हंगामी पाऊस पश्चिम घाट पर्वतरांगांच्या पूर्व किंवा पश्चिमेकडे वाहणार्या अनेक नद्यांना पोषण देतो, जे द्विपकल्पीय भारताचे मुख्य जलसंधारण क्षेत्र आहे. पश्चिम घाट हे द्विकल्पातील सर्व प्रमुख आणि अनेक लहान नद्यांचे उगमस्थान म्हणून उल्लेखनीय आहेत. प्रमुख नद्या उगम पावून पूर्वेकडे वाहतात. द्विपकल्प ओलांडून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अखेरीस त्यांचे पाणी बंगालच्या उपसागरात ओततात. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर, मोठ्या संख्येने लहान, कायमस्वरुपी, पश्चिमवाहिनी वेगवान नद्यांनी लहान लहान खाच केल्या आहेत, ज्या अरूंद पश्चिम किनारपट्टीच्या मैदानातून वाहून अरबी समुद्रात अरूंद खाड्या आणि खाडीमार्गे मिसळतात. यातील अनेक प्रवाहांमध्ये उल्लेखनीय जलप्रपात तयार होतात.
उत्तर भागात ओल्या ऋतूचा कालावधी सुमारे तीन महिने असतो, तर दक्षिणेकडे हा कालावधी नऊ महिन्यांपेक्षा जास्त असतो. पश्चिमेकडील, वार्याच्या दिशेच्या बाजूला वार्षिक पावसाचे प्रमाण काही ठिकाणी दोन हजार ते ७,५०० मि.मी.पर्यंत असते; परंतु पूर्वेकडील सावली प्रदेशात वेगाने कमी होऊन सुमारे ५५६ मि.मी.पर्यंत असते. पश्चिम घाटातून उगम पावून पूर्वेकडे वाहणार्या आणि संपूर्ण द्विपकल्प ओलांडणार्या तीन प्रमुख नद्या आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी या सर्व नद्या प्रौढ (Mature) अवस्थेत म्हणजेच इतक्या प्राचीन आहेत की त्यांनी त्यांच्या क्षरणाचा (erosion) आधार स्तर गाठला आहे. त्यांच्या खोर्या रूंद आणि उथळ आहेत आणि त्या सपाट गाळ प्रदेशातून वाहतात.
जिथे त्या संथगतीने वाहतात किंवा उंच प्रदेश आणि पठारांमधून प्रवाहित होतात, जिथे त्यांची गती जास्त असते आणि त्याप्रसंगी अरूंद दर्या आणि कडबोळ्यांना खोदतात. पश्चिम घाटातून उगम पावून पूर्वेकडे वाहणार्या आणि बंगालच्या उपसागरात मिळणार्या इतर लहान नद्याही आहेत. यामध्ये ताम्रपर्णी (अगस्तीमलाई पर्वतांमधून उगम पावत- १२८ कि.मी.) आणि वैगाई (वरुषणाड पर्वतांमधून उगम पावते-२५० कि.मी.) यांचा समावेश आहे.
सह्याद्रीच्या पश्चिम बाजूस अनेक लहान, कायमस्वरुपी, अर्धकालीन वेगाने वाहणार्या पश्चिमवाहिनी नद्यांची वैशिष्ट्ये आहेत. गुजरातपासून केरळपर्यंत या लहान, वेगवान पश्चिमवाहिनी नद्या तीव्र उतारावरून खाली झेपावत अरबी समुद्रात आपले पाणी सोडतात. किनारपट्टीकडे झेपावताना, या नद्या अनेकदा खोल दर्यांमधून जातात, ज्यामुळे नेत्रदीपक धबधबे तयार होतात. काही ठिकाणी २०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून पाणी खाली पडते, जेव्हा या नद्या भूवैज्ञानिक faults सामोरे जातात.
यामध्ये बेदती धबधबा (१३७ मीटर) ज्याला मागोड धबधबा म्हणूनही ओळखले जाते, जोग धबधबा (२५३ मीटर), chalakkudy धबधबा (५६ मीटर) आणि अनैमलाई पलनी अलैमलाई पर्वतरांगेतील २० ते ३०० मीटर उंचीच्या अनेक धबधब्यांचा समावेश आहे.
अरबी समुद्रात मिळणार्या पश्चिमेकडील नद्या delta तयार करत नाहीत, तर फक्त खाड्या तयार करतात. जिथे नद्यांचे गोडे पाणी आणि समुद्राचे भरतीचे पाणी मिसळते. delta तयार न होण्याचे संभाव्य कारण असे आहे की, या नद्या कठीण खडकांमधून वाहतात आणि म्हणूनच किनार्यावर वितरिके (distributaries) तयार करण्यास असमर्थ असतात. या भागातील किनारपट्टी ऐतिहासिक काळात समुद्राच्या दिशेने पुढे जात होती, याचा पुरावा म्हणजे सुरत, जे आता एक अंतर्गत शहर आहे, काही शतकांपूर्वी समुद्रकिनारी एक बंदर होते.
पश्चिमेकडील नद्या इतक्या मोठ्या संख्येने आहेत की त्यांची यादी करणे अशक्य आहे. फक्त केरळमध्येच ४४ पश्चिमवाहिनी नद्या आहेत.
पश्चिम घाटाच्या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांची यादी खालीलप्रमाणे आहे : गुजरात : पूर्णा, औरंगा, पार. महाराष्ट्र : सूर्या, वैतरणा, दामणगंगा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, गड, कजवी, कोडवली. गोवा : मांडवी (महादयी), झुआरी, तिराकोल, चापोरा, तळपोणा. कर्नाटक : काली, गंगावली (बेदती), अग्नाशिनी, शरावती, कोल्लूर-चक्र-गंगोळी, सीता, मुल्की, गुरुपूर, नेत्रावती. केरळ : चळियार, भरतपुज्हा, पेरियार, पंबा.
भू-क्षरण, गाळ संचयन आणि नदीय भूआकृतीक स्वरूप
पश्चिम घाटातील नदीदृश्यांमध्ये भू-क्षरण आणि संचयन प्रक्रियेने विविध प्रकारच्या fluvial land forms निर्माण केल्या आहेत. नद्या मुख्यतः हायड्रॉलिक क्रिया (hydraulic action), घर्षण (abarsion) आणि गंजणामुळे (corosion) भूमीचे क्षरण करतात. नद्या पश्चिम घाटातून उतरताना खडकाळ भागाचे क्षरण करतात, ज्यामुळे खोल दर्या आणि कडबोळे तयार होतात. उदाहरणार्थ, भीमा नदीने खोल दर्या खोदल्या आहेत, ज्यामुळे प्राचीन बेसाल्ट खडकांचे स्तर उघड झाले आहेत.
पावसाळ्यात जेव्हा नद्या पाण्याने भरून वाहतात तेव्हा भू-क्षारण अधिक तीव्र असते. त्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होते आणि गाळाचे वाहून नेणे वाढते. मोठमोठे खडे आणि गाळ खालच्या भागात वाहून नेले जातात. ज्यामुळे समतल भागामध्ये संचय होतो आणि नदीच्या तटावर alluvial सपाटी तयार होते.
पश्चिम घाटातील अनेक नद्यांच्या काठावर विकसित झालेले तट आढळतात. नदी तट हे नदीच्या ऊर्जेत आणि गाळाच्या प्रमाणात बदलामुळे तयार होतात, जे समुद्राच्या पातळीत, भूगर्भीय उचल किंवा हवामानातील बदलामुळे होतात. हे तट नदीच्या पूर्वीच्या पातळीचे चिन्ह दर्शवतात आणि भूतकाळातील भूआकृतीक प्रक्रियेचे महत्त्वाचे निदर्शक आहेत.
जलप्रपात आणि कडबोळे (Water falls and Gorges)
पश्चिम घाटातील नदीदृश्यांमध्ये जलप्रपात हे एक महत्त्वाचे भूआकृतीक वैशिष्ट्य आहे, जेथे नद्या कठीण खडकांवरून वाहत असल्याने त्या जलप्रपात तयार करतात. काही प्रमुख उदाहरणांंमध्ये जोग जलप्रपात, अथिराप्पिल्ली जलप्रपात आणि उंचल्ली जलप्रपात यांचा समावेश आहे. हे जलप्रपात पर्यटकांचे आकर्षण आहेत आणि भूआकृतीक प्रक्रियेत भूमिका बजावतात.
कडबोळे म्हणजे खोल आणि अरूंद दर्यादेखील पश्चिम घाटात सामान्य आहेत. हे सामान्यतः नद्यांच्या मध्य किंवा उच्च प्रवाहात आढळतात, जिथे पाण्याने लाखो वर्षांपासून खडकाच्या स्तरात खोदकाम केले आहे.
हवामानाचा आणि मानवाचा प्रभाव पश्चिम घाटात tropical मान्सून हवामान आहे, ज्याचा नद्यांच्या भूआकृतीक स्वरुपावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. नैऋत्य मान्सून या प्रदेशात जोरदार पाऊस आणतो. काही भागामध्ये वार्षिक सात हजार मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो. हा तीव्र पाऊस नद्यांना इंधन पुरवतो, ज्यामुळे जलद भू-क्षरण आणि नदीच्या प्रवाहात वारंवार बदल होतात.
मानवी क्रियाकलाप जसे की, धरणे बांधणे, जंगलतोड आणि कृषी विस्तार यांनी पश्चिम घाटातील नद्यांच्या भूआकृतीक स्वरुपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नद्यांच्या प्रवाहात आलेले पश्चिम बदल आणि खनिज उत्खनन यामुळे नदीच्या प्रवाहाचे आकारमान बदलले आहे. पश्चिम घाटातील नदीदृश्ये भूगर्भीय हालचाली, हवामान आणि भू-क्षरणाच्या प्रक्रियेमुळे आकारलेली गुंतागुंतीची प्रणाली आहे. या प्रदेशातील जलप्रपात, तट आणि कडबोळे हे नैसर्गिक इतिहासाचे अद्वितीय दाखले आहेत.
डॉ. शिल्पा डहाके,
नदी अभ्यासक, वास्तुविशारद आणि मानववंश शास्त्रज्ञ, अर्बन डायलॉग
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा