भारताच्या पश्चिम समुद्र किनार्याला समांतर असलेली अवाढव्य डोंगरांची रांग म्हणजे सह्याद्री! महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या ६ राज्यांना व्यापणारी सह्याद्रीची डोंगररांग आणि त्याभोवती असलेले जंगल म्हणजे जगातील सगळ्यात जास्त जैवविविधता असलेला प्रदेश. यामुळे सह्याद्रीचा समावेश जागतिक जैवविविधतेच्या मर्मस्थळांमध्ये होतो. सह्याद्रीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भौगोलिक आणि भूगर्भशास्त्रीय रचना. त्यामुळे तेथे असलेल्या जीवसृष्टीसाठी अनेक अनुकूल अधिवास तयार झालेले आहेत. या अधिवासांचे पर्यावरणीय महत्त्व आणि जैवविविधतेतील योगदान म्हणूनच समजून घ्यायला हवे.
‘अधिवास’ म्हणजे सजीवांच्या जगण्यासाठी, वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी योग्य असलेल्या जागा. समुद्र, समुद्रतळ, गवताळ प्रदेश, डोंगर-दर्या, जंगले, वाळवंटी प्रदेश आणि बर्फाच्छादित प्रदेश हे सर्व सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी अनुकूल असलेले सृष्टीतील प्रमुख अधिवास आहेत. तसेच डोंगरातल्या कडे-कपारी, चढ-उतार, माथ्यावरच्या सपाट जागा, काळ्या कातळातल्या गुहा, निसर्गनिर्मित तळी-तलाव, वाहणारे झरे, धबधबे, साचलेल्या पाण्याची डबकी, पाणथळ जागा, खडकांमधल्या दमट ओलसर जागा, झाडांच्या ढोली-खोबण्या, हेदेखील वैविध्यपूर्ण नैसर्गिक अधिवासच आहेत.
या सर्व अधिवासांच्या आश्रयाने अगणित सजीवांचे आगळेवेगळे आणि परस्परांमध्ये गुंतलेले अनोखे जग आहे. अत्यंत अल्पकाळच्या जीवनचक्रापासून अत्यंत दीर्घ, व्यामिश्र जीवनचक्र असलेले सजीव यात आहेत. आपले अस्तित्व कालचक्रात टिकून राहण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये अनेकानेक बदल करून घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने निसर्गातल्या विविध परिसंस्थाही बदलल्या, विस्तारल्या आहेत. अशी सजीवांची विशेषतः वनस्पतींची अनुकूलने पठारांवरच्या अधिवासांसंदर्भात अभ्यासणे हा अत्यंत रोचक आणि नव्या जाणिवा वाढवणारा विषय आहे.
सह्याद्रीतील समृद्ध पठारे
पठार म्हणजे डोंगराच्या माथ्यावर विस्तारलेला सपाट भूभाग. सह्याद्रीतील पठारे अत्यंत वैशिष्टयपूर्ण आहेत. साधारणतः दहा चौरस किलोमीटरपर्यंत विस्तार असलेली पठारे पश्चिमघाटात आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या काही भागांत कातळ किंवा सडेफ असेही म्हणतात.
पठार ही सजीवसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाची परिसंस्था आहे. पठारांवरील अधिवासांची आणि सूक्ष्म अधिवासांची संख्या जितकी जास्त, तितकी तेथे जैवविविधता जास्त असते. अधिवासातल्या परिसंस्थेत सहभागी प्रत्येक घटक त्या परिसंस्थेच्या समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे घटक परस्परावलंबी असतात.
माणूसही या परिसंस्थेचाच एक भाग आहे. निसर्गापासून माणूस कोणी वेगळा नाही. तरीही मागील अनेक वर्षांपासून माहितीचा अभाव, अज्ञान किंवा इतर अनेक कारणांनी माणसाकडून निसर्गचक्रावर अन्याय होत आहे. वरकरणी ओसाड, पडीक किंवा निरुपयोगी वाटणार्या या पठारांवर कोणतीही जीवसृष्टी अस्तित्वात नाही, अशा चुकीच्या समजुतीमुळे पठारांवर मानवी अतिक्रमण होते आहे. अस्तिव टिकण्याच्या स्पर्धेत पठारावरच्या वनस्पती कसे अनुकूलन करतात हे समजून घेणे मोठे रंजक आहे.
कंदहारी वनस्पती उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये असलेल्या टोकाच्या तीव्र हवामानामुळे पठारांवर सजीवसृष्टीसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते. उन्हाळ्यात डोंगरांवरचे बेसाल्ट, लॅटराईट खडक उन्हाने कडक तापतात. पावसाळ्यातल्या मुसळधार पावसात डोंगरावरील खडक, मातीतील क्षार, विविध धातू, खनिजे विरघळतात आणि पावसाच्या पाण्यात डोंगरावरील मातीबरोबर बर्याच प्रमाणात वाहून जातात. पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर इतर महिन्यांमध्ये बदलणार्या ऋतुचक्राप्रमाणे पठारांचे रूपही बदलत जाते. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत येथील हवामानात आद्रता असते. पण ऑक्टोबरनंतर मात्र पठारांवर शुष्क, कोरडे हवामान वाढत जाते आणि मेपर्यंत ते आत्यंतिक कोरडे होते. वाळलेल्या गवताआड झाकलेली पठारे एकदम उघडी-बोडकी ओसाड दिसायला लागतात. येथूनच पठारावरील जीवसृष्टीच्या जीवनचक्राच्या नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो. बदलणार्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरिता पठारावर असलेल्या अनेक वनस्पतींनी स्वतःमध्ये अनुकूल बदल करून घेतलेले आहेत.
पठारांवर मोठ्या प्रमाणात आढळणार्या ङ्गकंदहारी वनस्पतीफ याचे उत्तम उदाहरण आहेत. कंद म्हणजे अन्न साठवून ठेवण्याची क्षमता असलेला वनस्पतींचा भाग. आपली मुळे, खोडे यांचे रूपांतर कंदात करून त्यात प्रतिकूल काळात लागणारा अन्न आणि पाण्याचा साठा करून या वनस्पती जमिनीखाली सुप्त अवस्थेत तग धरून राहतात. कंदातील साठवलेल्या अन्नाचा वापर फुले आणि फळे येण्यासाठी केला जातो.
पाणी धरून ठेवणार्या सक्यूलंट वनस्पती
पठारांवरचे पाण्याचे स्रोत पावसाळ्यानंतर फार कमी काळ टिकतात. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांची पाने, मुळे आणि खोड यांच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता विकसित होते. आपली पाण्याची गरज त्या यातून भागवतात. यामुळे कोरड्या, शुष्क वातावरणातसुद्धा या वनस्पती आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात.
कीटकभक्षी वनस्पती
पठारावरील अनेक वनस्पतींचे परागीभवन ठराविक किटकांमार्फत होते. ते त्यांचे परस्परातील सामंजस्य असते. परंतु निसर्गातील काही कीटकांचा किंवा सुक्ष्मजीवांचा वापर काही वनस्पती आपली गरज भागवण्यासाठी करतात. मातीतल्या मूलद्रव्यांची, विशेषतः नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या वनस्पतींनी स्वतःमध्ये एकदम आश्चर्यकारक बदल घडवून आणला आहे.
युट्रिक्यूलारिया वनस्पतींच्या गटातील सर्व प्रजाती कीटक भक्षी आहेत. यांना ब्लॅडरवॉर्ट असेही म्हणतात. साधारणतः या वंशातील वनस्पती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ओलसर खडकावर उगवतात, जेथे माती नसल्यामुळे मूलद्रव्यांची कमतरता असते. या वनस्पतींच्या मुळांवर छोट्या पिशव्या असतात ज्यांना ब्लॅडर असे म्हणतात. या पिशव्यांना फक्त आतल्या दिशेनेच उघडणारे प्रवेशद्वार असते, ज्यातून पाण्याबरोबर आत गेलेले सूक्ष्म जीव एकदा आत गेले की पुन्हा बाहेर पडू शकत नाहीत. या वनस्पती त्या सुक्ष्मजीवातील सर्व पोषणद्रव्ये शोषून घेऊन आपली गरज भागवतात. खडकावर असलेल्या पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे या वनस्पतीमध्ये असे अनुकूलन घडले आहे.
वनस्पतींचा समूहिक बहर
पठारावरील काही वनस्पती एकदमच समूहाने फुलतात. संपूर्ण पठार वेगवेगळ्या रंगांच्या, आकारांच्या असंख्य लहान-मोठ्या फुलांनी बहरून जाते. हे दृश्य मोठे विलोभनीय दिसते.
वनस्पतींना असा सामूहिक फुलोरा/बहर का येतो?
पठारांवर असलेले विविध अधिवास एकमेकांच्या जवळजवळ असतात. त्यामुळे तेथे जागा फारशी मोठी नसते. शिवाय वनस्पतींना वाढीसाठी लागणार्या गोष्टींची कमतरता असते. कमीतकमी वेळात आपले जीवनचक्र पूर्ण करून इतर वनस्पतींसाठी जागा रिकामी करून देणे आवश्यक असते. सामूहिक फुलोरा आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक प्रमाणात परागीभवन करणारे कृमी, कीटक, पक्षी यांचे लक्ष वेधले जाते. त्यामुळे या वनस्पतींचे परागीभवन मोठ्या प्रमाणात होते. क्रॉस परागीभवन सुद्धा वाढते. त्यामुळे नव्याने तयार होणार्या वनस्पती जास्त आकर्षक आणि पुनरुत्पादनासाठी अधिक सक्षम होतात.
या बिया अनेक पक्षी-प्राण्यांचे आवडते खाद्य असतात. त्या सगळ्याच खाऊन संपल्या तर वनस्पती वाचणार नाहीत म्हणून भक्ष्यांविरुद्ध उत्क्रांतीवादी संरक्षण म्हणून अशी मोठ्या प्रमाणात फुलोरा येण्याची वनस्पतींना गरज असते. समूहाने फुलण्यात आणि बीजनिर्मितीसाठी या वनस्पतींना खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य कमी असते. या छोट्या आयुष्यकाळात त्यांना फक्त एकदाच पुनरुत्पादनाची संधी मिळते. नवीन पिढीतील रोपे आधीच्या रोपाच्या शेजारी, बाजूलाच उगवतात आणि कालचक्र सुरू राहते.
पठारावरील स्ट्रॉबिलांथस वंशातील प्रजाती विविध आकार आणि रूपात आढळतात. या वंशामध्ये पन्नासपेक्षा जास्त प्रजातींमध्ये जगण्यासाठी सामूहिक फुलोरा या विशिष्ट पद्धतीचे अनुकूलन दिसून येते. त्यांच्या फुलण्याचा काळ वैशिष्ट्यपूर्ण असतो. या वंशातील नीलकुरींजी (Strobilanthis kunthiana) या प्रजातीमधल्या वनस्पती बारा वर्षांनी एकदाच फुलतात. ही वनस्पती मुख्यतः पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जंगलांमध्ये आढळते.
याच वंशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची प्रजाती म्हणजेच स्थानिक भाषेत कारवी (स्ट्रॉबिलांथस कॅलोसा). कारवी साधारणतः ७ वर्षातून एकदा फुलते. त्या विशिष्ट वर्षात कारवीचे फुलोरे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यावर्षी मोठ्या प्रमाणात बियांचीही निर्मिती होते. बियांची विशिष्ट संरचना म्हणजे संपूर्ण बी वर असंख्य लहान केस आच्छादलेले असतात. ज्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
म्हणून या वनस्पतींची बी रुजवण क्षमता अतिशय चांगली आहे. ज्यातून पुढच्या पिढीची झाडे उगवतात. ही प्रजाती पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ती घनदाट झाडांचे आच्छादन तयार करून पठारावरच्या मातीच्या धूपाला प्रतिबंध करते. अनेक पक्षी, कीटक आणि मधमाश्यांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देते.
बुटकेपण देगा देवा!
पठारांवरच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे अल्पावधीत आपला जीवनकाळ पूर्ण करून ती जागा आणि संसाधने इतरांंसाठी मोकळी करता येणे ही वनस्पतींची गरज असते. म्हणून येथील बहुतांशी वनस्पतींचा आयुष्यकाळ हा काही महिन्यांचा असतो. अशावेळी आपली संपूर्ण ऊर्जा वनस्पतींना योग्य कारणासाठी म्हणजे अर्थातच पुनरुत्पादनासाठी वापरायची असते. मग उगीच उंच-उंच वाढण्यात काय हशील? शिवाय डोंगरावरच्या वार्यात टिकून राहायचे असेल, तर अंगात लवचिकता हवी. मग भलेही अंगाने थोडे खुजे, बुटके असले तर त्याचा फायदा वनस्पतींना खूप मोठा असतो. हे त्यांनी परिस्थितीशी केलेले अनुकूलनच आहे. त्यामुळे त्यांना लवकर फुलून-फळून बिया तयार करता येतात आणि जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहता येते.
अद्भूत गवताची गोष्ट
गवत माहीत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पण आपल्याला फक्त ‘चांगले गवत’आणि वाईट, निरुपयोगी गवत इतकेच त्याबद्दल माहीत असते. पण गवत हा पठारांवर असलेल्या वनस्पतींचा सगळ्यात मोठा गट आहे आणि पर्यावरणात त्याची खूप मोलाची भूमिका आहे. पावसाळ्याच्या शेवटी पठारांवर गवत समूहातील अनेक प्रजाती उगवतात. त्यानंतर पठारांवर त्यांचे वास्तव्य बर्याच कालावधीपर्यंत असते. यातील काही प्रजाती म्हणजे उदा. ट्रायपोगॉन या गटातील गवत उन्हाळ्याच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणातही टिकून राहते. या प्रजातीतील गवत त्याच्या पेशीतील पाणी संपूर्णपणे निघून गेले, कोरडे, शुष्क झाले तरीही ते मेलेले नसते.
या शुष्क अवस्थेत कोणालाही ते गवत आता कशाचाही उपयोगाचे नाही असेच वाटेल; पण त्याच्या पेशी मरत नाहीत. त्या पावसाची, पाण्याची वाट बघतात आणि पावसाच्या पहिल्या काही सरी गवतावर पडल्या की जणू काही नवी संजीवनी मिळाल्याप्रमाणे ती मृत दिसणारी पेशी ताजीतवानी, पूर्ववत होते. गवत आपल्या पेशीतील पाण्याचा साठा पूर्ववत करते आणि पुन्हा त्यांची वाढ जोमाने सुरू होते. हे एक दीर्घकाळ अस्तित्वात, स्पर्धेत टिकण्यासाठी विशिष्ट वनस्पतीचे अनुकूलन आहे.
ऑक्टोबरनंतर थंडीच्या सुरवतीपर्यंत गवतवर्गीय वनस्पती वाढलेल्या दिसतात. नंतर त्याही वाळून जातात आणि हळू हळू पठार कोरडे, शुष्क होत जाते. सह्याद्रीच्या पठारांवरील अधिवासांमध्ये असलेल्या प्रतिकूल आव्हानांना तोंड देण्यासाठी वनस्पतींनी शोधलेले हे अनुकूलनाचे मार्ग खरोखरच उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील आश्चर्येच नाहीतर काय?
आपल्या दिसण्या, जाणवण्याच्या क्षमतांच्या पलीकडे असलेले हे आत्यंतिक सूक्ष्मपासून वाढत झालेले सजीवांचे जग, ही संपूर्ण जीवसृष्टी ही अनमोल ‘संपदा’ आहे. संपदा म्हणजे ठेवा, ऐश्वर्य, खजिना. जो समृद्ध असणे, वाढणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी त्याचे संरक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. कारण हे जग केवळ निसर्गक्रमाशी सुसंगत नाही तर ते आपल्या आजूबाजूला असलेल्या संपूर्ण चराचराशीही सुसंगत आहे.
तसा तर निसर्ग आपल्यालाही आवडतो, पण त्याचे अस्तित्त्व आणि महत्त्व आपण मानवी उपयोगितेनुसार ठरवतो. विकासकामांसाठी जंगलतोड करताना तोडलेली झाडे दुसरीकडे लावण्याचा विचार आश्वासक खरा, पण पठारावरील वनस्पतींच्या बाबतीत हा उपाय शक्य नाही. कारण दुसरीकडे आपण त्यांना तेच वातावरण, अधिवास कसे देऊ शकणार?
या वनस्पती तर केवळ विशिष्ट अधिवासातच जगू शकतात. हे अधिवास निसर्गनिर्मित आणि अल्पकाळासाठीच अस्तित्वात असल्यामुळे अत्यंत संवेदनशील असतात आणि एकदा नष्ट झाल्यास त्यांची पुनर्निर्मिती जवळपास अशक्य असते. निसर्गातील अधिवास आपण समजून घेतले आणि जपण्यासाठी किमान त्यांचा गैरवापर जरी नाही केला, तर आज तितकेही पुरेसे आहे. यातून आपल्या पुढच्या पिढ्यांना मनमोकळा श्वास घेता येण्यापुरता निसर्ग आपल्याला जपायला हवा याचे भान मिळेल.
प्रा. डॉ. संजय औटी – वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख,
एच. पी. टी. आर्टस् आणि आर. वाय. के. सायन्स कॉलेज
ऋषिकेश जाधव
संशोधक विद्यार्थी